Description
मानवाच्या उदय व विकासात मिथकांनी मोठीच मदत केली आहे, यात शंका नाही. तार्किक पातळीवर न टिकणारी व चुकीच्या कार्यकारणभावावर आधारलेली मिथके धर्मग्रंथांमध्ये ‘पवित्र कथा’ म्हणून स्थिरावली. त्यामुळे धार्मिक विधीचा भाग म्हणून त्यांना मान्यताही मिळाली. अनेक विर्धीच्या स्पष्टीकरणासाठीही मिथके रचली गेलीत.
‘मिथक’ या शब्दासाठी ‘पुराणकथा’ हा शब्दही मराठी भाषेत प्रचलित आहे. या शब्दामधून केवळ पुराणांमधील कथा हा अर्थ ध्वनित होतो, ही या शब्दाची मर्यादा आहे. पुराणांच्या निर्मितीपूर्वी वैदिक, जैन व बौद्ध साहित्य रचले गेले आहे. त्यामुळे त्यांमधील कथांना पुराणकथा म्हणणे चुकीचे आहे, असे काही अभ्यासकांना वाटले. त्यामुळे त्यांनी ‘पुराणकथा’ या शब्दाऐवजी ‘प्राक्कथा’ व ‘पुराकथा’ हे शब्द वापरावेत असे सुचविले. प्राचीन कथा या अर्थाचे हे शब्द आज मिथकचर्चेत प्रचलित आहेत. मिथके प्राचीन काळात रचली गेलीत, असे गृहीतक यामागे कारणीभूत होते. परंतु मिथके आधुनिक काळातही रचली जातात, हे एक वास्तव आहे. कारण की, मिथकनिर्मितीची प्रक्रिया मानवी मनात सतत चालू असते. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकातील ‘तळीराम’ हे पात्र दारूड्या माणसाचे प्रतीक म्हणून भाषाव्यवहारात स्थिरावले आहे. त्यामधून ‘तळीराम गार झाला’ हा वाक्प्रचार मराठी भाषेत निर्माण झाला. या नाटकातील तळीराम, सुधाकर, सिंधू ही पात्रे म्हणजे आधुनिक काळातील मिथके होत. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. त्यामुळे प्राक्कथा व पुराकथा या शब्दांच्याही मर्यादा स्पष्ट होतात.

Reviews
There are no reviews yet.