Description
माहिती ही ताकद असते, असे म्हटले जाते आणि इतर कुठल्याही यंत्रणेपेक्षा ही गोष्ट गुप्तचर यंत्रणांना अतिशय चपखलपणे लागू होते.
सन 1962 चे युद्ध आणि 1965 चे पाकिस्तानचे युद्ध या 1960 च्या दशकातील दोन घटनांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेची तातडीने पुनर्रचना आणि पुनरुज्जीवन करण्याची गरज अधोरेखित झाली होती. या दोन्ही युद्धांच्या वेळी, माहिती गोळा करण्यातील धक्कादायक अपयश समोर आले होते. चित्रपटांनी आणि कादंबऱ्यांनी उभ्या केलेल्या गुप्तचराच्या अद्भुतरम्य प्रतिमेच्या अगदी विरुद्ध असलेले काव हे गुप्तचर यंत्रणेची पुनर्रचना करण्याची मुख्य जबाबदारी पेलण्यास अत्यंत पात्र व्यक्ती होते.
भारताच्या रिसर्च एंड एनालिसिस विंगच्या म्हणजेच ‘रॉ’ च्या संस्थापक – प्रमुखाने प्रसिद्धीच्या झगमगाटापासून अतिशय दूर राहून काम करण्यास आणि जगण्यास प्राधान्य दिले. संयतपणे आणि सुसंस्कृतपणाने काम करत राहिल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले नसले तरी काव यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेला जागतिक नकाशावर नेऊन ठेवले यात कसलीच शंका नाही. या उत्कंठापूर्ण आणि वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकात अनुषा नंदकुमार आणि संदीप साकेत यांनी आधुनिक भारतीय गुप्तहेर यंत्रणेचा पाया कसा घातला गेला, वाचा मागोवा घेतला आहे आणि नव्यानेच स्थापन झालेल्या ‘रॉ’ने बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची रोचक माहिती दिली आहे.
काव यांचे एकच उद्दिष्ट होते : भारताच्या सुरक्षिततेची आणि ऐक्याची हमी देणाऱ्या आणि त्याकरिता गोपनीय माहिती गोळा करणाऱ्या गुप्तचर यंत्रणेची उभारणी करणे. अखेरीस त्यांनी उभारलेल्या त्यांच्या टीमला ‘कावबॉईज’ असे टोपणनाव मिळाले आणि कावबॉईजची दंतकथा जगभर सर्वत्र पसरली. याची सुरुवात कशी झाली, कोणत्या गुप्त मोहिमा आखल्या गेल्या याविषयीची साद्यंत हकिकत सांगणारे, तसेच धाडस आणि झटपट विचार करून निर्णय घेणे यांचे महत्त्व अधोरेखित करणारे वाचलेच पाहिजे असे पुस्तक. प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढून मिळवता येणाऱ्या विजयांइतकेच युद्धभूमीपासून दूर राहून लढवल्या जाणाऱ्या डावपेचांतूनही युद्धे कशी जिंकता येतात याची सत्यकथा !
Reviews
There are no reviews yet.