Description
दुःख एवढेच आहे, साथ तुझी नाही आज
कसे सोसावेत घाव
एकट्याने पुनः पुन्हा ?
साथ सोडून जाण्याचा
कसा केलास तू गुन्हा ?
घाव घालण्याची त्यांना
झाली आहे अशी घाई
माझ्या हृदयी ग्रंथी काय
साधा त्यांना पत्ता नाही
जाणण्यास वेळ नाही
ठेवण्यास येई चेव
आधी करती कत्तल
मग विचारतो नाव
किती करावे खुलासे
खुले असुनी आयुष्य ?
विना तसदी तयांना
आहे ठोकायचे भाष्य
आज मित्रांचेही थवे
अमित्रांना हे फितूर
ओळखीचे सूर आज
कसे जाहले बेसूर ?
कधी होतात भूकंप
कधी येते वावटळ
तुझ्या माघारी रक्षिते
परी सुहृदांचे बळ
तरी कधी मन म्हणे
कशाला मी रोखू घाव ?
हात ज्यांनी उगारला
थंड त्यांचा होतो जीव
जेव्हा काळाच्या ओघात
जागा होईल विवेक
जाणतील सत्यासत्य
दूर होता धूळफेक
तुझ्या संगती सोसले
असे किती घाव रोज
दुःख एवढेच आहे
साथ तुझी नाही आज
आम्रवृक्षाची मंजरी
दूती भावुक हळवी
कल्पनेत का होईना
भेट आपली घडवी
Reviews
There are no reviews yet.