Description
भारत हा मुळात बहुसांस्कृतिक देश आहे. येथील सांस्कृतिक इतिहास मिथकांनी भरलेला आहे. वैदिक परंपरेने ज्ञानाची देवता म्हणून सरस्वती या देवतेचा पुरस्कार केला. परंतु त्याचवेळी ज्ञान हे फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णीय पुरुषांपर्यंतच सीमित राहील याची पुरेपूर काळजी घेतली. स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र (अस्पृश्य) यांना ज्ञानाच्या परिघाबाहेर ठेवण्याचे कपटकारस्थान वैदिकांनी केले. त्यामुळे जरी सरस्वती ही विद्येची देवता म्हटली गेली, तरी स्त्रिया व शूद्रातिशूद्रांना मात्र ज्ञानबंदी लादली गेली. याउलट सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने शूद्रातिशूद्रांच्या ज्ञानाच्या उद्गात्या ठरल्या. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ज्ञान सर्वांसाठी खुले असेल अशी घोषणाच त्यांनी केली. ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणासी । धरावे पोटाशी बंधुपरी ।। अशी सर्वसमावेशक समतेची भूमिका फुले दांपत्याची होती. या द्वंद्वात आपण स्वत: कोण आहोत आणि आपल्यासाठी ज्ञानगंगा आणणारी देवता कोण आहे, हा कल्चरली करेक्ट करणारा बुनियादी सवाल वाचकांनी स्वत:लाच विचारला पाहिजे. ज्ञानाचा प्रकाश मूठभरांच्या ओंजळीत सोडणारी सरस्वती व वैदिक परंपरा आपली आहे, की सर्वांसाठी ज्ञान खुले करणारी सावित्रीबाई व सत्यशोधक परंपरा आपली आहे, हे ठरविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी संदीप सारंग यांचे सरस्वती की सावित्री हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Reviews
There are no reviews yet.