Description
अण्णा भाऊ साठे (१९२०-१९६९) : कुठलेही औपचारिक शिक्षण नसलेले अण्णा भाऊ साठे हे एक प्रख्यात लेखक झाले हे मराठी साहित्याच्या इतिहासातील एक आश्यर्च आहे. सर्वमान्यतेने पहिले लक्षणीय व समर्थ दलित लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अण्णा भाऊंनी दलित लेखकांच्या पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभाचे कार्य केले. स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यानंतरच्या काही काळातील महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे व संस्कृतीचे ते पहिले प्रमुख इतिवृत्तकार होते. कारण त्या जीवनाचे व संस्कृतीचे त्यांना सखोल आकलन होते व प्रत्यक्ष अनुभवसुद्धा होता.
भटक्या व पददलित अशा समाजाच्या दुर्लक्षित घटकांवर जवळजवळ प्रथमच प्रामाणिक, समर्थ व प्रत्ययकारी लेखन करून त्यांनी अगदी नवीनच विषयांची खाण मराठी साहित्यात उघडली.
महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘तमाशा’ या लोककलेचे त्यांनीच ‘लोकनाट्यां’मध्ये रुपांतर करून त्या कलेला गांभीर्य, प्रतिष्ठा व सामाजिक मान्यता मिळवून दिली.
स्वतः तळागाळातील समाजातून आलेले असल्याने व जन्मभर त्याच पातळीवरील आयुष्य जगल्याने ते कधीही हस्तिदंती मनोऱ्यातील लेखक बनले नाहीत. स्वतः गरीब वर्गातील असल्याने ते केवळ कवी, कथाकार व कादंबरीकारच नव्हते, तर कम्युनिस्ट पक्षाचे निष्ठावंत असे सक्रिय कार्यकर्तेही होते. कम्युनिझमच्या अंधानुकरणापासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवल्याने जे लोक कम्युनिस्ट नाहीत, अशांच्या हृदयालाही त्यांचे साहित्य हात घालते.
Reviews
There are no reviews yet.