Description
पुरातत्वशास्त्रातील सुरुवातीचा काल केवळ कलात्मक अथवा संग्रहालयात ठेवण्याजोगा भव्य वस्तू मिळविण्यात घालवला जाई, याचा निर्देश आधी केलाच आहे. इराकमधील प्राचीन असीरीय लोकांची नगरी निमरूद येथे लेयार्ड याने १८४५ साली उत्खनन केले. उत्खननाचे ध्येय विशद करताना तो म्हणतो की, ” कमीतकमी वेळात आणि कमीतकमी पैशात जास्तीत जास्त अखंड वस्तू मिळविणे हे माझ्या उत्खननाचे ध्येय आहे.” याचा सरळ अर्थ असा की, वस्तू ओरबडून काढायच्या. त्यांच्या स्तर वगैरेची चिंता करावयाची नाही, फुटक्या – तुटक्या वस्तू फेकून दयावयाच्या. हाच उद्देश अठराव्या – एकोनिसाव्या शतकात ग्रीक व पश्चिम आशियात इंग्रज व फ्रेंच प्रवाशांचा होता.
आपण पाहिलेच की सुरवातीच्या काळात तरी पुरातत्व विषयक हालचाली केवळ छंद भागविण्याची हौस यापलिकडील अवस्थेत गेल्या नव्हत्या. यात दोन बाबी अंतर्भूत होत्या. पहिली म्हणजे कलात्मक वस्तु जशा अथवा जेथून मिळतील तेथून जमवून शौक म्हणून आपल्याजवळ ठेवावयाच्या, आणि दूसरी म्हणजे जे काही उत्खनन फावल्या वेळी मित्रमंडळींच्या सहाय्याने करावयाचे, त्यातील फ़क्त चांगल्या दिसणाऱ्या वस्तुंचीच दखल घ्यावयाची. एवढ्यापुरतीच पुरातत्वाची मजल गेलेली होती. व्हीलर यांनी आपल्या ” आर्किओलॉजी फ्रॉम द अर्थ ” या पुस्तकात सुरुवातीच्या कालातील उत्साही पुरातत्व शौक़ीन मंडळींचे वर्णन केले आहे. केवळ चार दिवसात एकेका टेकाडाचा खणून फडशा पाडणारी ही इंग्लंडमधील मंडळी खणून खणून दमली म्हणजे अधूनमधून करमणुकीचे खेळ खेळायची आणि पाऊस आला तर छत्र्या घेऊन काम करायची. अशा तऱ्हेचा देखावा आता कोणत्याही उत्खननात वा संशोधनात पहावयास मिळायचा नाही. या कालात या कामात एक तऱ्हेचे अद्भुततेचे वलय, एक तऱ्हेचा नवखा छंद आणि उत्कृष्ट व कलात्मक वस्तू मिळवणाचे ध्येय फ़क्त दिसून येतात.
Reviews
There are no reviews yet.