Description
भूतकाळातल्या दुर्लक्षित क्षणांच्या जखमा आजही भारतमातेला ब्रिटिशांच्या गुलामीच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी झुंजणाऱ्या आणि अनामिक राहून शहीद झालेल्या इथल्या क्रांतिवीरांच्या वंशज कुळांच्या हृदयात स्तब्ध होऊन भळभळ वाहत आहेत. इतिहासाने त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. असे सूर आज त्यांच्या दगड-माती झालेल्या कणाकणात घुमसतात; तेव्हा इतिहासालासुद्धा वाटते आपण या कुळांना काहीच देऊ शकलो नाही. या गोष्टीचं दुःख देखील त्या सुरांमधून वाहत जाऊन शेवटी कधी ना कधी इतिहासाच्या मूक वेदना सत्य ओकू लागतात.
परकीय ब्रिटिश सत्तेला पिटाळून लावण्यासाठी हजारो देशभक्त, क्रांतिवीर निर्माण करणाऱ्या क्रांतिपिता लहुजींच्या नावात एक जागृत ज्वालामुखी धगधगत आहे. मातृभूमीच्या स्वातंत्र्य संग्रामाचा क्रांतिपिता लहुजींनी पेटवलेला यज्ञकुंड पाहून असे वाटते, आजपर्यंत जगात घडलेल्या अनेक क्रांत्यांच्या ज्योती क्रांतिपिता लहुजींवर ओवाळून टाकाव्यात.
आणि पुन्हा एकदा या क्रांतिवीरांनी प्रकाशात यावं आणि क्रांतिपिता लहुजींची स्फूर्ती व प्रेरणा घेऊन उभं ठाकावं. भारतमातेच्या मंदिरासमोर खऱ्या स्वातंत्र्याची पहाट उगविण्यासाठी ! शंकर तडाखे
Reviews
There are no reviews yet.