Description
ज्या काळात मोगलशाही मोडकळीच्या अवस्थेला पोचली होती त्या काळात श्री छत्रपती महाराजांनी अतिशय मुत्सद्देगिरीने मराठ्यांच्यात चैतन्य निर्माण केले व साऱ्या हिंदुस्थानात मराठ्यांचा दरारा निर्माण केला. अत्यंत धूर्तपणे त्यांनी मोगलांच्या कराळ दाढ़ेतून आपली सुटका करून घेतली व छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पुनर्स्थापना करून स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर घडविण्यात ते यशस्वी झाले. स्वत:च्या हिमतीवर व पराक्रमाने ते स्वराज्याचे छत्रपती झाले. त्यांचा स्वभाव शांत आणि सौम्य होता. स्वराज्यातील प्रजेला शत्रूचा त्रास होऊ नये म्हणून वेळ प्रसंगी शत्रूशी त्यांनी मानहानिकारक तडजोडी करीत असीम त्याग केला. त्याकडे इतिहासकारांनी सोईस्कर दुर्लक्ष करून शाहूमुळे मराठेशाही मोगलांच्या दावणीला बांधल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवून त्यांना दुर्बल लेखण्यात इतिहासकार यशस्वी झाले आहेत.
शाहू महाराजांनी सर्वार्थ स्नेह व सलोखा ठेवून उमदया विचारांची माणसे जमवली. जो शहाणा व पोक्त आहे अशा बाजूला पडलेल्या माणसांना अनुकूल करून घेवून त्यांना मानाची पदे दिली. स्वराज्य विस्तारासाठी कर्तबगार सरदारांना प्रोत्साहित केले. शाहू महाराज हे उदात्त विचाराचे व सर्वांवर उदार अंत:करणाने प्रेम करणारे राजे होते. शाहू महाराजांचा पेशव्यांवर वचक होता. त्यांचे जीवन आणि व्यक्तिमत्व कादंबरी पेक्षाही आश्चर्यकारक असल्यानेच प्रजेने त्यांना ‘पुण्यश्लोक’ ही पदवी बहाल केली. अशा अलौकिक राजाचा जीवनवृत्तांत संक्षिप्तरित्या वाचकांपुढे मांडण्यास मला धन्यता वाटते.
Reviews
There are no reviews yet.