Description
अभियांत्रिकी क्षेत्रात डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे उत्तुंग पर्वतशिखराएवढे उंच होते, अशी इतिहासाने नोंद करून ठेवली आहे. इतिहास असेही म्हणतो, कि एखाद्या व्यक्तीची महानता हि त्याने किती संपत्ती कमावली किंवा किती मोठी सत्ता उपभोगली यावर ठरत नाही. त्या व्यक्तीने मानवाच्या हितासाठी व प्रगतीसाठी काय योगदान दिले यावर ती ठरते ; आणि ह्या कसोटीवर तपासून पहायचे ठरवले, तर विश्वेश्वरय्या अधिकच उंच भासू लागतात.
ते एक महान अभियंता होते, एक उत्तम प्रशासक होते, एक उद्योगपती होते, एक शिक्षणतज्ज्ञ होते, एक अर्थतज्ञ होते, एक समाजसेवक व क्रीडाप्रेमी होते, एक लेखक होते, एक ‘द्रष्टे महापुरुष’ होते. उत्तुंग अशी स्वप्ने पाहून ती सत्यात उतरवणारे ‘स्थितप्रज्ञ’ होते. ‘सक्तीचे प्राथमिक शिक्षण आणि गरिबांना व पददलितांना मोफत शिक्षण’ हे धोरण भारतात प्रथम त्यांनी आणले. मोठे उद्योग, त्यासाठी पैसा हवा म्हणून आपली स्वतःची (राज्याची) बँक, कुशल मनुष्यबळ लागेल म्हणून शिक्षण व तंत्रज्ञान संस्था, ग्रामीण कृषिप्रधान जीवन सुखी व्हावे म्हणून शेतकी शाळा व कॉलेज, शिक्षण आपल्या गरजेनुसार देता यावे म्हणून ‘आपले’ विदयापीठ ; असे एक ना अनेक उपक्रम त्यांनी राबवले. पायाभूत सुविधा विकसित केल्या. राष्ट्राच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना हि कल्पना लिखित स्वरूपात मांडली.
म्हणून ते काळाच्या पुढे पाहणारे विचारवंत ! द्रष्टे ! द्रष्टा एम. व्ही. ! अशा व्यक्तींची ओळख करून घेणे म्हणजे जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळवणे ! सतत कठोर परिश्रम, शिस्त, काम आणि त्यावरचे प्रेम यांतून किती मोठा पल्ला गाठता येतो, हे दर्शवणारे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, अर्थात, एम. व्ही.! त्यांच्या व्यक्तिमत्वाने समाजावर जे गारुड केले, ते तुम्हालाही नक्कीच संमोहित करेल.
Reviews
There are no reviews yet.