Description
भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) ह्या अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्यता निवारणाचे कार्य करणाऱ्या संस्थेची स्थापना करणारे द्रष्टे समाजसुधारक व प्रभावी ब्राह्मधर्मप्रसारक म्हणून विठ्ठल रामजी शिंदे (1873-1944) हे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर प्रख्यात आहेत. भारतीय समाजाची पुनर्रचना करण्याच्या दृष्टीने त्यांचे सामाजिक स्वरूपाचे कार्य जसे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे त्यांचे विविध स्वरूपाचे लेखनही मौलिक आहे.
शिंदे हे धर्म, इतिहास, समाजशास्त्र या विषयांचे शिस्तशीर संशोधक व व्यासंगी अभ्यासक होते. 1905 सालापासून भारतीय अस्पृश्यतेचे पद्धतशीर संशोधन करण्यास त्यांनी प्रारंभ केला. धर्म, भाषा, समाजशास्त्र यासंबंधी त्यांनी जसे महत्त्वपूर्ण संशोधनपर लेखन केले आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्या, स्त्रीशिक्षण, दुर्व्यसने व मुरळीसारख्या अनिष्ट प्रथा या सामाजिकदृष्टया महत्त्वाच्या विषयांवर मूलगामी स्वरूपाचे वैचारिक लेखनही केले आहे.
महर्षि शिंदे यांच्या रोजनिशी, आत्मचरित्र व प्रवासवर्णनपर अशा ललित स्वरूपाच्या लेखनातून त्यांची तरल संवेदनशीलता, सौंदर्यग्राही रसिकता, नर्म विनोदवृत्ती आणि भाषेच्या सामर्थ्याची यथोचित जाण दिसून येते; तसेच त्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण व व्यापकपणे पाहणारी जीवनदृष्टी ह्या व्यक्तिमत्त्वविशेषांचाही प्रत्यय येतो. महर्षी शिंदे यांचे लेखन महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक दृष्टीने जसे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे वाङ्मयीन गुणवत्तेच्या दृष्टीनेही सरस आहे.
प्रस्तुत पुस्तकाचे लेखक गो. मा. पवार हे साहित्य अकादेमी पुरस्काराने सन्मानित झालेले मराठीमधील साक्षेपी समीक्षक व महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचे व साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत.
Reviews
There are no reviews yet.