Description
किमयागार म्हणजे खरंच विश्वाचा इतिहास आहे, तो विज्ञानाचा इतिहास आहे, त्यात शास्त्रज्ञांची चरित्रं आणि बऱ्याच गंमतीजमती आहेत. यातून खरीखुरी विज्ञानाची तत्त्वं सोप्या भाषेत, हसतखेळत शिकता येतील. हा एक उत्सव आहे, जल्लोष आहे – मानवी धारिष्टयाचा, जिद्दीचा, कुतूहलाचा, हट्टीपणाचा, वेडेपणाचा, स्वार्थाचा, नि:स्वार्थीपणाचा एकंदरीत सगळं काही जे मानवी आहे त्या सगळ्यांचा.
यात सर्वप्रथम भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स आहे. त्यात तीन भाग आहेत. एक म्हणजे, रिलेटिव्हिटीपर्यंतचा प्रवास, दूसरा म्हणजे, क्वांटम मेकॅनिक्स आणि तिसरा म्हणजे, कॉस्मोलॉजी यांचा. विश्व कसं निर्माण झालं याची गोष्ट इथं संपते. यानंतर जिओलॉजी किंवा भूशास्त्र आहे. यात पृथ्वीचं विज्ञान तर आहेच; पण त्याचा शोध घेतानाच्या अनेक गंमतीजमती आहेत. यानंतर केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र आहे. त्यात सगळी रसायनं इनऑर्गेनिक आणि ऑर्गेनिक यांच्या विषयीच्या थिअरीज तर आहेतच; पण इथं आपल्याला अनेक विक्षिप्त शास्त्रज्ञही भेटतील. सगळ्यात शेवटी बायोलॉजी किंवा जीवशास्त्र आहे. पहिल्या जीवनिर्मितीपासून ते माणूस तयार होण्यापर्यंतची कहाणी त्यात रेखाटलीय. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला असंख्य शास्रज्ञ भेटतील. काही माहीत असलेले आणि काही कदाचित माहीत नसलेले; आणि यात सहसा बाहेर फारशा माहीत नसलेल्या त्यांच्या प्रचंड गंमतीजमती आपल्याला दिसतील.
रिकाम्या वर्गाला १७ वर्ष शिकवणारा न्यूटन आपल्याशी बोलेल; मरणानंतर चुकीच्याच माणसाचा पुतळा लेव्हायजेच्या जागी अनेक दशकं उभा असलेला दिसेल; स्वप्नामध्ये दिसल्यामुळे जागेपणी शोध लावणारा केक्यूल आपल्याला भेटेल; दररोज तेच खाणारा आणि तसाच पोशाख घालणारा कव्हेंडिश आपल्याशी चर्चा करेल; गेंड्याचं मांस, हत्तीच्या सोंडेचं सूप आणि ऐसे चित्रविचित्र पदार्थ चवीनं खाणारा बक्लाण्ड आपल्याला भेटेल; आयुष्यात कधीही दाढी न केलेला मेंडेलिव्ह; एक्स – रेजचा शोध लावूनही पेटंट न घेता कफल्लक अवस्थेत मरण पावलेला नोबेल लॉरेट रंटजेन; लाफिंग गैसच्या पार्ट्या करणारा डेव्ही; काहीच तास उशीर लागल्यामुळे शोधाचं श्रेय आणि पैसा हुकलेले शास्त्रज्ञ असे अनेकजण आपल्याला या कहाणीत पानोपानी भेटतील, आणि त्यामुळेच या विश्वाच्या, मग पृथ्वीच्या, मग त्यावरच्या रसायनांच्या आणि शेवटी पृथ्वीवरच्या पहिल्या जीवाच्या आणि त्यानंतर माणसाच्या उगमाची कहाणी समोर एखाद्या चित्रपटासारखी उलगडत जाईल !
Reviews
There are no reviews yet.