Description
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र महाराष्ट्रातील सामान्य जनतेसह इतिहासकार व साहित्यिकांना नेहमीच आस्थेचे व कुतूहलाचे वाटत आले आहे. यातूनच भारतीय इतिहासकार व साहित्यिकांच्या लेखणीतून छत्रपती शिवाजी माहाराजांविषयी भारतीय भाषांमध्ये लेखन होत आलेले आहे. याचवेळी पाश्चात्य इतिहास संशोधकांना व मध्ययुगीन सामान अभ्यासकांनाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, काळ व कर्तृत्व याविषयी ओढ निर्माण झालेली आहे. भारतातील इस्लामी राजवटीच्या शिरकावापासून इंग्रजी सत्तेच्या स्थिरीकरणापर्यंतचा मध्ययुगीन भारताचा इतिहास हा मोठ्या संघर्षाचा आणि पराक्रमाचा आहे. मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि चरित्र हे केवळ पराक्रमाचेच नव्हे तर त्यांच्या जीवनातील योगायोग, त्यांचा अतुल पराक्रम, त्यांच्या जीवनातील दैवी चमत्कार आणि शत्रूलाही अचंबित करणारा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यांनी भरलेले आहे असे असेल तरी; छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिगत जीवनाकडे पाहताना त्यांच्या ठायी असणारी अन्यायास प्रतिकार करण्याची वृत्ती, त्यांचे नैतिकता व न्यायबुद्धी, प्रजा, मित्र आणि सहकाऱ्यांविषयी त्यांच्या मनातील आत्मीयता, आई जिजाऊ व त्यांच्या मनात असणारी स्त्रियांविषयी आदरबुद्धी, त्यांच्यातील मानवीय गुणांमुळे साहजिकच कोणीही त्यांच्याकडे आकर्षित होतो. मित्र, प्रजा व स्वधर्मीय लोकांबरोबरच त्यांनी तत्कालीन परधर्मीय व मुस्लिम लोकांविषयी बाळगलेली सहिष्णुता या व अशा अनेक कारणांनी छत्रपतींचे जीवन आजही लोकांच्या व जनसामान्यांच्या आदरास पात्र आहे.

Reviews
There are no reviews yet.