Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय समाजाची पुनर्रचना स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मुल्यांच्या अधिष्ठानावर करायची होती. राजकीय संरचनेमधील लोकशाहीचे मूल्य आणि सांसदीय लोकशाही शासनयंत्रणा व संविधानिक पद्धती हीच त्यांनी आपल्या पुनर्रचनेच्या सिद्धांताची अंमलबजावणी करण्याचे योग्य मार्ग ठरविले होते. आणि त्यासाठी लागणारी समतापोषक मानसिकता व संविधानिक नीतिमत्ता यांची जोपासना करणारा बुद्धधम्म भारतीय जनमानसात रुजवायचा होता. केवळ सैद्धांतिक मांडणी करूनच बाबासाहेब थांबले नाही तर त्यांनी विविध संस्था निर्माण करून आपल्या सिद्धांतांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत दमदार सहभाग घेतला. पारतंत्र्यातील भारतीय समाजापासून ते संविधानाधिष्ठित स्वतंत्र भारतातील राजकीय प्रक्रियेत त्यांनी ‘स्वतंत्र मजूर पक्ष’, ‘शेड्यूल कास्ट फेडरेशन’ हे पक्ष स्थापन केले; आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील पुनर्रचनेचा आधार होण्यासाठी ‘भारतीय रिपब्लिक पक्ष’ या राजकीय पक्षाची संकल्पना मांडली.
डॉ. आर. के. क्षीरसागर यांनी सामाजिक पुनर्रचनेच्या प्रक्रियेतील बाबासाहेबांच्या योग्दानाची आणि त्यांनी स्थापन केल्या तिनही पक्षांची उत्क्रांत होत गेलेली भूमिका खोल अनुशीलनाने मांडली आहे. ‘भारतीय रिपब्लिकन पक्ष’ बाबासाहेब आंबेडकरांच्या देहावसानानंतर स्थापन झाला, आणि त्यानंतरच्या 58 वर्षात त्याला यशही मिळाले, परंतु शेवटी त्याची वाताहत झाली; त्याचा इतिहास या ग्रंथात मांडला आहे. पण हे ते महत्त्वाचे नाही तर बाबासाहेबांचे संविधानिक तत्त्वज्ञान, त्यांचे राजकीय-आर्थिक धोरण आणि त्यांचे ध्येय आज त्यांच्या नंतरच्या तिसऱ्या पीढीपर्यंतच्या आंबेडकर अनुयायांनी जिवंत ठेवले आहे. उद्या होणाऱ्या ‘आंबेडकर रिपब्लिकन क्रांती’ चा उत्कर्ष या आंबेडकरी रिपब्लिकन जनतेच्या वैचारिक, राजकीय आणि संघटनात्मक उठावामधूनच होणार आहे. डॉ. आर. के. क्षीरसागर यांनी लिहिलेला हा ग्रंथ या उठावाची आकांक्षा निर्माण करून रिपब्लिकन क्रांतीची प्रेरणा निर्माण करेल, अशी खात्री वाटते.

Reviews
There are no reviews yet.