Description
डॉ. आंबेडकर यांनी विद्वानांची एक परिषद दिल्लीला बोलाविली आणि त्या परिषदेत झालेल्या चर्चेनुसार पुनः काही सुधारणा करून हिंदू कोड बिल भारतीय लोकसभेत आणण्याकरिता प्रसिद्ध केले. पुढे ते बिल भारतीय लोकसभेपुढे चर्चेकरिता निघाले. पण त्या चर्चेतून शेवटी एकच गोष्ट निष्पन्न झाली ती म्हणजे सदर बिल कायदा होऊ शकले नाही. माझ्या समजुतीने हिंदू कोड बिलाबद्दल ही जी दुर्दैवी घटना घडली त्याची बरीचशी जबाबदारी पुरोगामी विचारसरणीच्या बुद्धिमान लोकांनी या बिलाबद्दल जी अनास्था दाखविली त्या अनास्थे- वरच आहे.
१८५० पासून जेव्हा जेव्हा हिंदू कायद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तेव्हा हिंदू धर्म संकटात आला आहे असा आक्रोश उद्धारक जनतेकडून करण्यात आला. पण त्या आक्रोशाला कधी मिळाले नव्हते इतके यश हिंदू कोड बिलाच्या प्रकरणी स्वतंत्र हिंदुस्थानच्या लोकसभेत मिळाले. ही घटना निःसंशय विषादास्पद आहे. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये हिंदू कायद्यातील एखाद्या मुद्द्यावर सुधारणा करण्याकरिता जेव्हा जेव्हा बिल कायदेमंडळापुढे येई, तेव्हा तेव्हा त्या बिलाच्या समर्थनार्थ विद्वान व बुद्धिमान अशा समाज सुधारकांनी केलेल्या विद्वत्ताप्रचुर चर्चा व त्यांनी लिहिलेले लेख जर आपण वाचाल तर हिंदू कोड बिलाच्या प्रसंगी सुशिक्षित बुद्धिमान वर्गाने दाखविलेल्या अनास्थेबद्दल मी जो दोष देत आहे त्याचे रहस्य आपल्याला कळेल. हिंदू कोड बिल लोकसभेपुढे असताना त्या बिलातील मूलभूत तत्त्वांबद्दल जनतेला जागृत करण्याचा पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी विशेष प्रयत्न केला नाही. हिंदू कोड बिलाला अनुकूल अशी बौद्धिक चर्चा जवळजवळ झालीच नाही असे मला वाटते व त्याचाच परिणाम म्हणजे हिंदू कोड बिल हे नुसते बिल राहिले व त्याचे कायद्यात रूपांतर होऊ शकले नाही. हिंदू कोड बिलाचा झालेला पराभव म्हणजे स्वातंत्र्य-युगातील पुरोगामी बुद्धिवादाचा झालेला हृदयविदारक पराभव होय !

Reviews
There are no reviews yet.