Description
” भाऊराव, तुम्ही खरे कर्मवीर आहात. तुम्ही नांगराचे रूमणे टाकले, हातात लेखणी घेतली; पण ती हूडपणात मोडून गेली. कळले ते तुम्हाला, कळल्यावर वळले म्हणजे झाले. तुमच्या आयुष्याचे भटकणारे तारू किनाऱ्यावर लागले. सातारच्या शूर भूमीवर तुम्ही पाय रोवून उभे राहिलात. अठरापगड जातींची मुले गोळा केली आणि त्यांना ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यन्त तुम्ही स्वत:च पाठ देऊ लागलात. तुम्ही शून्यातून सृष्टी निर्माण केली.
भाऊराव, मी विलायतला फेरफटका मारून आलो. सारा भारत देश पायाखाली घातला. राशियाचा तो टॉलस्टॉय पाहिला, शांतिनिकेतनातला तो जगप्रसिद्ध कवींद्र पाहिला आणि पॉडेचरीच्या शांत वातावरणात ईश्वर चिंतनात मग्न झालेला तो योगिंद्र अरविंद पाहिला; पण तुमच्यासारखा जबर गडी मी कुठे पाहिला नाही. या महापुरुषांना पाहून बुद्धि चकित झाली; पण ह्रदय कोरडेच राहिले. त्यांचे तंत्र मंत्र हवेतच तरंगत राहिले. त्यांचे धर्मज्ञान हिमालयाच्या शिखराभोवती फिरत राहिले. बाकी अफाट प्रदेश कोरडा ठणठणीत राहिला. हिंदू समाजाने हजारो वर्षे ज्यांना सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीत ठेवले, ज्यांचे चित्त हिरावून घेतले, ज्यांचे चित्त पिळून घेतले आणि तरीही ज्यांचे पित्त खवळले नाही, अशा मलूल झालेल्या अस्पृश्य बांधवांना माणुसकीचा हक्क मिळवून देण्यासाठी मी हयातभर झगडलो.
शास्त्री पंडितांनी कड्या कुलुपात लपवून ठेवलेले ज्ञानाचे भांडार मी फोडले. भाऊराव, तुम्ही महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्या धुंडाळल्या आणि झोपड्या – झोपड्यांतून सापडलेले माणिकमोती गोळा करून आणलेत. आपणच आपल्या हयातीत लावलेल्या झाडाचे फळ खायचे भाग्य तुम्हास लाभले. केवढे तुम्ही भाग्यवान ! धन्य ती सातारची भूमी आणि धन्य तिचे सुपुत्र !”
Reviews
There are no reviews yet.