Description
माणूस इथून तिथून सारखाच – चांगला किंवा वाईट किंवा चांगला वाईट कुठल्याही धर्माचे वेष्टन लावा, नाहीतर काढा. गांधीजींनी म्हटले होते ‘धर्म’ हा वृक्ष आहे. या धर्माला फुटलेल्या फांद्या म्हणजे सर्व धर्म होत. माणूस कुठल्याही धर्माचा असला, त्याला त्या धर्माची माहिती नसली तरी धर्म शुभ करणाऱ्याची, नीतीने वागणाऱ्याची, न्यायाची चाड असणाऱ्याची चिंता वाहतो हे त्याला अवश्यमेव कळते. राजकारण करणाऱ्यांनाही हे माहीत असते. परंतु त्याबरोबर हेही माहीत असते की, माणसाला श्रेष्ठपणाचे आकर्षण असते. राजकारणी याचा फायदा घ्यायला टपलेले असतात. या बरोबरच माणसात सहानुभूती, सहकार्य एकमेकांचा आदर करण्याची प्रवृत्ती असते जी माणसातील अहंभावावर अंकुश ठेवते. या प्रवृत्तीला चेतविण्याचे कार्य गांधीजींनी केले.
सत्यासत्य, न्यायान्याय, नीती-अनीती, सूडबुद्धी- क्षमाशीलता ही द्वंदे सामान्य माणसाच्या आणि नेत्यांच्या मनात उद्भावितात, पण नेत्यांच्या द्वंद्वांचे परिणाम संपूर्ण समाजावर होत असतात. सामान्य माणसांची जीवनशैली ती द्वंद्वें घुसळून काढतात. परस्परांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या दोन्ही बाजूंना आपली बाजू सत्य आहे हे दर्शवायचे असते. सत्य हे आहे की, यापैकी एकच बाजू सत्य असते. अंतिमत: सत्याचा विजय होतो असे म्हणतात. परंतु ‘अंतिमत:’ हा शब्द फसवा आहे अंतिमत: ‘सत्य’ बाजू परास्त झाली की, तिचा लढा विजय मिळेपर्यंत चालेल तद्वतच समजा असत्याचा पराभव झाला तर असत्यही त्याला अंतिम न मानता सत्याचा पराभव करायची नव्याने तयारी करील!
Reviews
There are no reviews yet.