छत्रपती राजाराम महाराजांच्या या प्रस्तुतच्या चरित्र ग्रंथाच्या विषयाची ही पार्श्वभूमी वाचकांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे, असे आम्हास वाटते. या कालखंडातील इतिहासाची मराठी साधने म्हणजे वतनपत्रे, सनदपत्रे, महजर इत्यादी. त्यातून एखाददुसरी ओळ तत्कालीन इतिहास-लेखनासाठी उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ स. १६८९च्या मोगलांनी मराठ्यांचे गडकोट व ठाणी घेऊन स्वराज्याचा ग्रास घेतला. त्यासंबंधी जेधे शकावली फक्त एका वाक्यात म्हणते, “ते वर्षी कुल (सर्व) गड मोगले घेतले” कोणते गड कसे कसे घेतले याच्या वृत्तांतासाठी आपणास खाफीखान, साकी मुस्तैदखान, भीमसेन सक्सेना, ईश्वरदास नागर इत्यादी मोगल इतिहासकारांच्या ग्रंथांवर, मोगल सरदारांच्या पत्रव्यवहारांवर व औरंगजेबाच्या दरबारातील बातमीपत्रांवर (अखबार) अवलंबून राहावे लागते. आमची या काळातील ऐतिहासिक साधने फारसी, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज अशा परक्या भाषांतील आहेत. ही साधने उपलब्ध झाली नसती तर आपणास १७ व्या शतकातील शिवशाहीचा (स. १६३०-१७०७) इतिहास लिहिता आला नसता.
आपल्या इतिहासाचे आद्य इतिहासकारही कास्मा-द-गार्डासारखे पोर्तुगीज, रॉबर्ट ऑर्मसारखे इंग्रज, स्प्रिंगेलसारखे जर्मन होते. जेम्स अँट डफ (इंग्रज) हा तसे पाहिले तर मराठ्यांचा खरा आद्य इतिहासकार. कारण त्याने मराठ्यांच्या स्वराज्य स्थापनेपासून त्यांच्या अस्तापर्यंतचा इतिहास तीन खंडांत लिहून प्रसिद्ध केला. मराठ्यांचा समग्र इतिहास लिहिणारा हा पहिला इतिहासकार होय. तो सातारा येथील रेसिडेंट होता. त्याला वाटले की, ज्यांच्यापासून आपण राज्य जिंकून घेतले त्या मराठ्यांनी राज्य कसे स्थापन केले, कसे वाढविले व कसे घालविले, हे आपण राज्यकर्ते म्हणून जाणून घ्यायला हवे. कारण कोणत्याही समाजाचे गुणदोष समजून घेण्यास त्यांच्या इतिहासाशिवाय अन्य कोणते साधन असू शकत नाही. डफच्या या मनोदयास मुंबई प्रांताचा तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन याचे मोठे प्रोत्साहन मिळाले. डफचा ग्रंथ तीन खंडांत इंग्लंडमध्ये स. १८२६ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत कॅ. केपन याने स. १८२९ साली या ग्रंथाचे मराठी भाषांतर ‘मराठ्यांची बखर’ या नावाने प्रसिद्ध केले. हीच बखर वेगवेगळ्या रूपात मुंबई इलाख्यातील शाळांमधून ‘मराठ्यांचा इतिहास’ म्हणून शिकवली जाऊ लागली. अव्वल आंग्लाईतील पहिल्या आंग्लविद्याविभूषित पिढीने आपला इतिहास याच ग्रंथावरून जाणून घेतला.
Reviews
There are no reviews yet.