Description
विठ्ठल सोमाजी शिंदे यांचा जन्म नाशिक जिल्हयातील इगतपुरी तालुक्यातील बाजार घोटीजवळील शेनवड (बुद्रक) या गावी १२ एप्रिल १९५५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण इगतपुरीच्या जनता विद्यालयात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यार्थी वसतिगृहात राहून एस.एस.सी. पर्वत शिक्षण घेऊन आर. के. तलरेजा महाविद्यालय, उल्हासनगर येथून मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी दशेतच दलित पॅंथर संघटनेत ते कार्यरत झाले. १९८९च्या पंथर बरखारस्तीपर्यंत आणि नंतरही काम करीत राहिले. सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी मोलाची भर घातली. साहित्यक्षेत्रात, नाट्यक्षेत्रात प्रत्यक्ष भाग घेतला. १९८४च्या पहिल्या दलित नाट्य संमेलनात ते सामील झाल्यापासून आजवर आंबेडकर रंगभूमीवर कलावंत म्हणून कार्यरत आहेत. अभिव्यक्तीचा मिळेल त्या क्षेत्राचा वापर करून त्यांनी समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. आंबेडकरी प्रेरणेच्या बोधी सांस्कृतिकतेत त्यांनी मौलिक भर घातली. विठ्ठल शिंदे आजही आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. निरनिराळ्या माध्यमांचा वापर करताना त्यांनी आजवर दोनशेच्या आसपास गेयकविता म्हणजेच गाणी लिहिली आहेत. त्याशिवाय मुक्तछंदातल्या शंभरच्या वर होतील इतक्या कविता लिहिल्या आहेत. ‘तुफानातले दिवे’, ‘पहिला पाऊस पहिलं प्रेम’ हया आल्बम सोबत ‘आंदोलनाची दिशा’ हे वैचारिक लेखांचं स्वतंत्र पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. महाकवी वामनदादा कर्डकांच्या मोहळ कवितेचं ‘मराठी वैचारिक गद्याचं’ सर्वोत्कृष्ट एकांकिकाचं संपादन त्यांनी केलं आहे. ‘गोंधळ’ या त्यांच्या एकांकिकेचा ‘साहित्य अकादमी’च्या संपादनात समावेश केला गेला आहे.
विठ्ठल शिंदे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षक समितीवर आणि दूरसंचार सल्लागार समितीवर काम केले असून सद्या ते मुंबई विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक) यांच्या विषयतज्ज्ञ समितीवर कार्यरत आहे.
Reviews
There are no reviews yet.