Description
दुसऱ्या जागतिक महायुद्धातील युरोपमधल्या निर्वासित कुटुंबातले मूल म्हणून वाढत जेसन स्टॅन्ली यांनी आता तत्त्वज्ञ म्हणून ख्याती मिळवली आहे. लोकशाही समाज कसे सहज फॅसिझमला बळी पडू शकतात, याची अतिशय प्रगल्भ जाण त्यांना आहे. फॅसिस्ट राजकारणाला बळी पडण्यासाठी कोणताही देश फॅशिस्ट राजवटीखाली असण्याची गरज नसते. किंबहुना, अमेरिकेत फॅसिझमची मुळे शतकभरापेक्षा जास्त काळापासून खोल जात चालली आहेत. फॅशिस्टांच्या युक्त्या प्रयुक्त्या देशातच नव्हे, जगभरात ज्या चिवटपणे लढवल्या जात आहेत ते पाहून या पुस्तकात स्टॅन्ली यांनी फॅसिस्ट राजकारण्यांना आधार देणारे दहा स्तंभ कोणते, यावर लक्ष केंद्रित केले आहे. लोकांना आपण आणि ते अशा दोन गटांत विभागणारी भाषा कोणती, श्रद्धा कोणत्या हे त्यांनी स्पष्ट मांडले आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि वंशभेदाची सैद्धांतिक मांडणी या साऱ्या धाग्यांना एकत्र विणून ते वर्तमानातील हंगेरी, पोलंड, भारत, म्यानमार आणि अमेरिका अशा अनेक देशांतील घटनांचा वेध घेतात. या साऱ्या फॅशिस्ट क्लृप्त्यांना कमी लेखून चालणार नाही, असा स्पष्ट इशारा ते देतात. यात पौराणिक कथा, दंतकथा वगैरेंच्या आधारे राष्ट्राचा भूतकाळ वापरून घेणे, प्रचारतंत्राद्वारे लोकशाही आदशांची भाषाच विकृत करणे, बुद्धिवादाच्या विरुद्ध मोहोळ उठवण्यासाठी विद्यापीठांवर, तज्ज्ञांवर हल्ले करणे, अल्पसंख्याक गटांचे लोक गुन्हेगारच आहेत हे कथन कायदा आणि सुव्यवस्थेच्या व्यवस्थेमार्फतच ठळक करत नेणे, श्रमिकांच्या संघटनांवर आणि कल्याणकारी योजनांवर हल्ला चढवणे यांचा समावेश होतो. या सर्व प्रचारयंत्रणा एकमेकांसोबत एकत्रपणे काम करून समाजातील भेदभाव वाढवण्याच्या प्रयत्नांत असतात. समाजाची धारणा हुकूमशाही नेत्याच्या राजवटीच्या बाजूने होईल, असे प्रयत्न करत असतात.
आज हे जे फॅशिस्ट राजकारणाचे खेळ चाललेले दिसतात, ते अतिशय व्यथित करणारे आहेत. स्टॅन्ली आपल्याला दाखवून देतात, की भडक भाषणे आणि दंतकथा यांचा जोरदार वापर करणारे राजकारण अखेरीस धोरण आणि वास्तवाला आकार देत जाते. फॅशिस्ट राजकारण वेळच्या वेळी ओळखले, तरच आपण त्याच्या अतिशय तीव्र दुष्परिणामांपासून स्वतःला वाचवू शकू, हेच जेसन स्टॅन्ली यांचे सांगणे आहे.
Reviews
There are no reviews yet.