Description
‘वैजयंता’ ही अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातली अजोड, कल्पक, वास्तवालाही लाजवणारी अशी बावन्नकशी सोनं असणारी कादंबरी ! तमाशा कलावंताच्या जीवनाची होणारी हेळसांड, स्त्री कलावंतांकडे बघण्याचा समाज दृष्टिकोन यावर प्रकाशझोत टाकणारी तशी मराठी साहित्यातली ही पहिलीच कलाकृती म्हटलं तरी वावगे ठरू शकणार नाही ! चंद्राकडून वैजयंताची आई गजराच्या झालेल्या पराभवाची सल गजराला बोचणी देत असतानाच आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी म्हणून वैजयंता एकदाच तमाशात नाचायचं ठरवते नि तिच्या पायात बांधलेले चाळ तिच्या फरफटीला निमित्त ठरतं. लहानपणीचा मित्र उमावर तिचं प्रेम असतं, परंतु ती तमाशात नाचली म्हणून उमा तिला टाळू लागतो, त्याचे आई- वडीलसुद्धा पूर्वी याच क्षेत्रात असूनही उमाचा बाप त्या दोघांच्या लग्नाला नकार देतो. तमाशाचा कंत्राटदार चंदूलाल याच्या मनात वैजयंता भरते नि तिच्या जीवनाचाच खऱ्या अर्थाने तमाशा सुरु होतो ! तो हाट धुवून तिच्या पाठीमागे लागतो. ‘मी कलावंत आहे. माझी कलाच सादर करणार’ म्हणून ती त्याला टाळते. तो इरेला पेटतो. रंजक घटना, घडणारे नाट्यमय प्रसंग, त्यातून खऱ्या कलावंतांची होणारी ससेहोलपट, त्याला खंबीरपणे तोंड देणारी वैजयंता सिनेमातल्या कथेतल्या नायिकेसारखी झुंज देते नि खरंच तिच्यावर या नावाचा चक्क सिनेमाच होतो. नाट्य नि घटनांनी ठासून भरलेली मनावर, मस्तकात घट्ट कोरली जाणारी अशी ही नाट्यमय ‘वैजयंता’ कादंबरी !

Reviews
There are no reviews yet.