Description
यूनेस्को (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघ) या सर्वोच्च संघटनेच्या, मानवी हक्कांच्या जाहिरनाम्याच्या प्रास्ताविकेचा प्रारंभ मुळी धम्मपदाच्या पहिल्या गाथेवर आधारित घोष वाक्याने झाला आहे. ”ज्या अर्थी युद्ध मानवी मनात उद्भवतात, त्यामुळे शांततेच्या संरक्षणाची बांधणी मानवी मनात झाली पाहिजे.” धम्मपदाचे वैश्विक कल्याणकारी रूप विशद करण्यासाठी या गाथाच पुरेशा आहेत, कारण पुढील २६ वग्गांमधील ४२३ गाथांमधून माणसाच्या सर्व विकारांवर, सर्व सद्गुणांवर, कुशल कर्मावर आणि अकुशल कर्मावर टिप्पणी करून, बुद्धाच्या नैतिक तात्त्विक विचाराचे विवेचन करण्यात आले आहे. मानवी मनावर संस्कार करून, व्यक्तीला तसेच मानव समूहाला कुशलकर्माकडे वळविणारी जी व्यवस्था तथागतांनी निर्माण केली तिचे सार जशा या गाथा आहेत, तशाच त्या धम्म व्यवस्थेच्या पायाभूत अंग सुद्धा आहेत. त्रिपिटकाच्या उपदेशांचे सार, त्या त्या धम्म संवाद (discourse) प्रसंगी तथागतांच्या उदानांमधून व्यक्त होत असत, अशा गाथांचे संकलन हे धम्मपद आहे. बुद्धविचार व्यापक जनसमूहांच्या मनास भिडण्यासाठी, सहज समजून घेण्यासाठी, मुखोद्गत करण्यासाठी धम्मपदाच्या गाथा, त्यांचे गेय्य काव्यमय रूप अत्यंत समर्पक आहे. बुद्धाच्या केवळ गृहत्यागी भिक्खू अनुयायांनाच नव्हे तर गृहस्थ उपासकांना सुद्धा धम्मपदातील उपदेशांचा लाभ व्हावा अशा रीतीने या उपदेशांची रचना करण्यात आली आहे.

Reviews
There are no reviews yet.