Description
‘सच्ची रामायण’ हे ई. वी. रामासामी नायकर ‘पेरियार’ यांचे सर्वाधिक चर्चेत असलेले आणि वादग्रस्त पुस्तक आहे. पेरियार रामायणाला एक राजकीय ग्रंथ मानत. ते म्हणत की दक्षिणेतील अनार्य लोकांवर उत्तरेतील आर्यांनी मिळवलेल्या विजयाला आणि वर्चस्वाला अधोरेखित करण्यासाठी रामायण लिहिले गेले. सोबतच ब्राह्मणेतरांवर ब्राह्मणांचे आणि स्त्रियांवर पुरुषांचे वर्चस्व निर्माण करण्याचे हे एक साधन आहे असे ते मानत.
रामायणातील मूळ आशय उलगडण्यासाठी पेरियार यांनी ‘वाल्मिकी रामायण आणि इतर राम कथांचे अनुवाद, जसे की ‘कंब रामायण, तुलसीदास रामायण, रामचरितमानस’, ‘बौद्ध रामायण’, ‘जैन रामायण’ इत्यादींचा जवळपास चाळीस वर्षांहून अधिक काळ सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी ‘रामायण पादीरंगल’ (रामायणातील पात्रे) या पुस्तकात रामायणाची टीकात्मक समीक्षा केली. हे पुस्तक १९४४मध्ये तामिळ भाषेत प्रकाशित झाले. त्याची इंग्रजी आवृत्ती १९५९ साली ‘द रामायण अटूरीडिंग’ या नावाने प्रकाशित झाली.
उत्तर भारतातील लोकप्रिय बहुजन कार्यकर्ते ललई सिंग यादव यांनी १९६८ साली हे पुस्तक हिंदीत ‘सच्ची रामायण’ नावाने प्रकाशित केले.
९ डिसेंबर १९६९ रोजी तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारने त्यावर बंदी घातली आणि पुस्तके जप्त केली. या बंदीच्या आणि जप्तीच्या विरोधात ललई सिंग यादव यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि खटला जिंकलासुद्धा. परंतु अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. १६ सप्टेंबर १९७६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने देखील या प्रकरणावर उत्तर प्रदेश सरकार विरोधात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने निकाल दिला.
या पुस्तकात ‘द रामायण: अ टूरीडिंग’ या पुस्तकाचे मराठी भाषांतर देण्यात आले आहे. यासह ‘सच्ची रामायण’ आणि पेरियार यांचे चरित्र यावर आधारित लेख देखील देण्यात आले आहेत, ज्यामुळे त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचा इतिहास समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.