Description
महाराष्ट्राच्या इतिहासात विद्या जागृतीचा उदय म. जोतीराव फुले यांनी केला. त्यांचे विचार म्हणजे शुक्रोदय होय. श्री. शिवरायांची स्फूर्ती व तेज आणि स्मृती आज वर्धमान होत आहे. त्याप्रमाणे सत्यशोधक जोतीबा फुले यांचे नवीन व क्रांतिकारक विचार मराठी मनात एकसारखे नांदत आहेत. तुकोबांप्रमाणे जोतीबा अमर व अभंग आहेत. परंतु मोठी माणसे एखाद्या विचार-समुद्राप्रमाणे असतात. कर्मवीर त्यातून स्वकर्माने नाव चालवितात व या नावेतून अनेक माणसे प्रपंचात तरून जातात. ‘विद्या’ म्हणजे फक्त ज्ञान नव्हे किंवा शिक्षणही नव्हे. विद्येत शिक्षण तर येतेच, पण उद्यमधंदेविषयक ज्ञानही येते. साक्षरतामूलक शिक्षणाच्या मागणीप्रमाणे ‘औद्योगिक’ शिक्षणाचीही मागणी हंटर कमिशनपुढे जोतीरावांनी मांडली होतीच. म. जोतीरावांना सर्व कार्यभाग उरकता येणे शक्य नव्हते. ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून हा गरिबांचा वाली व दीनदुबळ्यांचा कैवारी निजधामास निघून गेला ! जागृतीच्या कामाचा मोठा डोंगर दूर पाठीमागे दिसत होता. या कामास सर्वथैव वाहून घेणारी जी अनेक मंडळी होऊन गेली, त्यांनी फार काम केले. ‘विद्या शिकणे हे आपले कर्तव्यच नव्हे, हा आपला धर्म नव्हे’. ही समजूत व हा भ्रम, भोळाभाव सत्यशोधक नांगराने उखडून निघाला, ही क्रांती यशस्वी झाली. या नांगरटीतून नवा महाराष्ट्र व नवे रक्त आणि नवी जागृती पिढीपुढे आली. या आघाडीवरील कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे एक महान नेताजी आहेत. कारण ते जोतीबांच्या मागे पाठीमागे चालून पुढे जाणारे वारकरी- कर्मवीर ठरले. भाऊरावांचे चरित्र अनेक भाऊराव निर्माण करील. सत्यशोधक समाज आज जिवंत आहे असे म्हणावयास प्रत्यक्ष रयत शिक्षण संस्थेची एकच जिवंत साक्ष पुरी आहे.
Reviews
There are no reviews yet.