Description
हिंदू धर्मावर टीका करणे हे फारच जबाबदारीचे व अनेक कारणांस्तव अवघड काम आहे. पाश्चात्य राष्ट्रांच्या राजकीय दास्यात सापडल्यामुळे हिंदी राष्ट्रवादाची दुरभिमानात व अंधश्रद्धेत परिणती झाली आहे. त्यामुळे या व्याख्यानांतील विचार अंधश्रद्धांच्या जिव्हारीं लागतील. स्वकीय संस्कृती, स्वीय धार्मिक संस्था व स्वत:च्या समाजाचा इतिहास चिकित्स्क व टीकात्मक दृष्टीने तपासण्याचे धैर्यच शिक्षितांच्या ठिकाणी शिल्लक राहिले नाही. स्वत:च्या परंपरेच्या विरुद्ध बंड करणारा बुद्धिवादच स्वत:च्या राष्ट्रात व समाजात उच्चतर स्थित्यंतर घडवून आणू शकतो. परंतु पूर्वपरंपरेचे लंगडे समर्थन करणाऱ्या विचारसरणीसच भारतीय समाजात अग्रपूजेचा मान आहे. परंपरागत मूल्यांची तपासणी करणारी, जुन्या संस्था, जून विचार आणि जून आचार यांची दयामाया न ठेवता शास्त्रीय रीतीने छाननी करणारी, चालू समाज रचना आणि धर्म यांच्यावर बौद्धिक हल्ला करणारी व सामाजिक नव जीवनास प्रसविणारी चिकित्सा सोसण्याइतके मानसिक बल फार थोड्या भारतीयांच्या थाई शिल्लक आहे. जे जुने जग, गळ्यातील लोढने बनून, मनुष्याच्या प्रगतीस अडथळा करीत आहे, त्याचा विनाश करणारी शास्त्ररूपी विचारशस्त्रे निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक पुरोगामी तत्त्वचिंतक व कर्तृत्वशाली लोक करीत आहेत. त्या शास्त्र रुपी शस्त्रांनी जुन्या जगाशी लढता लढता, जुन्या वर्तमान समाजांतील मानसिक व भौतिक दास्याचा ज्यात मागमूसही नाही असे, सगळ्या समाज घटकांना सारखेच स्वातंत्र्य प्राप्त करून देणारे, सर्व समाज घटकांच्या कर्तृत्वाच्या पूर्ण विकासास अवसर देणारे नवे जग घडवायचे आहे. त्या कर्त्या लोकांच्या सेनेत दाखल झालेला एक पायिक एवढाच प्रस्तुत वक्त्याचा दर्जा आहे. हा वक्ता ती विचारशस्त्रे घडविणारा एक साक्षेपी कामगार आहे.
Reviews
There are no reviews yet.