Description
चिनी प्रवासी भिक्खू फा-हिआन, ह्यू-एन-त्सँग आणि इ-त्सिंग इसवी सनाच्या चौथ्या आणि सातव्या शतकात भारतात बुद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी आणि बौद्ध ग्रंथ मिळविण्यासाठी आले होते. त्यांनी लिहिलेल्या आपल्या प्रवास वर्णनावरून भारतातील बुद्धधम्माचा इतिहास समजण्यास बरीच मदत मिळते. पुराणवस्तू संशोधन खात्याचे प्रसिद्ध संशोधक सर कनिंगहॅम यांनी या चिनी प्रवासी भिक्खूंच्या प्रवास वर्णनाचा आधार घेऊनच भारतातील बौद्ध स्मारके शोधून काढली. ह्या तीन चिनी प्रवासी भिक्खूंनी भारतात प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टींचे यथावस्तू वर्णन केले नसते तर भारतातील बुद्धधम्माचा इतिहास कळणे अवघड होते. त्यांनी लिहिलेल्या प्रवास वृत्तांतावरून युरोपियन संशोधकांनी बौद्ध स्थळे शोधून काढली. त्यांनी प्रयत्नपूर्व शोधून काढलेल्या बौद्ध स्थळांतील शिलालेखावरून आणि इतर स्मारकांवरून बौद्ध इतिहास समजण्यास तर मदत झालीच पण त्यांच्या संशोधनामुळे बौद्ध संस्कृतीची सुद्धा माहिती झाली.
श्रीलंकेतील ‘महावंस’ आणि ‘दीपवंस’ या पाली ग्रंथांतून सुद्धा भारताचा सुरवातीचा बुद्धधम्माचा इतिहास कळतो. अशोकावदन या संस्कृत ग्रंथातून सम्राट अशोकाच्या काळातील सर्वास्तिवाद्यांच्या दृष्टिकोनातून सम्राट अशोकाविषयी माहिती मिळते. भारतीय संशोधकांनी फार परिश्रमपूर्वक संशोधन करून भारतातील बौद्धांच्या विषयी अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत. या सर्वांच्या परिश्रमामुळे भारतातील बुद्ध धम्माविषयी माहिती मिळते. नाहीतर भगवान बुद्ध आणि बुद्धधम्म इतिहास ही बाब पुराणातील कथांप्रमाणे कपोलकल्पित कथा समजली गेली असती.

Reviews
There are no reviews yet.