Description
आपण सर्वांनी शाळेत इतिहास घोकला आहे. आपल्यापैकी काहींनी महाविद्यालयात त्याचे आणखी थोड़े अध्ययन केले असेल. चंद्रगुप्त, अशोक, शिवाजी, अकबर, औरंगजेब, तात्या टोपे, झाशीची राणी अशा कित्येक भारतीयांबरोबरच सीझर, अलेक्झांडर, नेपोलियन, जॉर्ज वॉशिंग्टन, हिटलर, लेनिन अशा परकीयांशीही आपण ओळखी करून घेतल्या आहेत. ह्या व्यक्ती केव्हा, कुठे, जन्मल्या आणि मेल्या आणि त्यांनी कोणती कार्य केली हयाबाबतचे काही तपशील आपण पाठ केलेले आहेत. पानीपतचा संग्राम, अठराशे सत्तावनचा उठाव, फ्रेंच राज्यक्रांती, वॉटर्लूची लढाई अशा भारताच्या आणि भारताबाहेरील जगाच्या इतिहासातील काही घटनांची कारणे आणि परिणामही आपण मुखोद्गत केले आहेत विद्यार्थीदशा संपल्यानंतरही काहींनी इतिहास वाचण्याचा छंद असेल. ऐतिहासिक कादंबऱ्या, नाटके आणि चित्रपट ह्यांतूनही तो इतिहास पुन्हा पुन्हा आपल्याला आठवण देता, “उठा, जागृत व्हा, तुमचा इतिहास तुम्हाला काय सांगतो आहे ? आपल्या थोर पूर्वजांचे स्मरण करा, त्यांच्यापासून स्फूर्ती घ्या आणि कामाला लगा.” इथे इतिहास नुसते तपशील नव्हे तर काही संदेश घेऊन येताना दिसतो.
परंतु कधी कधी कुणी ” काय करायच्या आहेत त्या जुन्या – पुराणया गोष्टी?” असा खणखणीत सवालही टाकीत असतात. इतिहास म्हणजे भुतकाळ, होऊन गेलेल्या गोष्टी. तेव्हा मुळातच असा प्रश्न विचारता येईल की त्या जुन्या – पूराण्या हकीकती आम्हाला काय करावयाच्या आहेत? आपला काय संबंध त्यांच्याशी? आपल्या आजच्या जीवनाचे प्रश्न सोडवायला त्यांचा काही उपयोग होणार आहे का ? असल्यास तो किती आणि कसा ? आपल्या भूतकाळाचे ज्ञान नसेल तर माणसाचे काही अडून राहील काय ?
वरील मूलभूत प्रश्नांची उत्तर शोधणे भाग आहे. त्यासाठी माणसाचा इतका पिच्छा पुरविनारा तो इतिहास आहे तरी कोण आणि कसा, हे आधी जाणून घ्यावे लागेल. इतिहास म्हणजे काय आणि तो कशासाठी ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे हाती लागतीलच असे नाही. पण निदान ती आपल्याला शोधावयाची आहेत ह्याची जाणीव झाली पाहिजे. त्यासाठी योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने चिंतन व्हायला हवे. अशा चिंतनाला काही साहाय्य व्हावे एवढ्यासाठीच हा ग्रंथ प्रपंच आहे.
Reviews
There are no reviews yet.