Description
महाराष्ट्राचा इतिहास आणि सांस्कृतिक जडणघडण समजून घ्यावयाची झाल्यास महाराष्ट्राचा भूगोल आणि भूरचनेची वैशिष्ट्ये लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रदेशाची आणि त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची लक्षात येण्याजोगी काही वैशिष्ट्ये असतात. ही वैशिष्ट्ये त्या त्या प्रदेशातील नैसर्गिक घटकांशी संबद्ध असतात. आजही आपण निरनिराळ्या प्रांतातल्या लोकांबद्दल काही समज त्याप्रमाणे गैरसमज मनात बाळगून असतो. यातील गैरभाग काढून टाकला तरी उरलेले समाज कोणत्या कारणाने दृढ झालेले असतात याची पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक असते. किंबहुना १९६० साली सध्याच्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती मराठी भाषेच्या भावबंधाने झाली तरी महाराष्ट्रातल्या विविध भागातील लोकांचे एकमेकांबद्दल काही ठाम समज आजही दिसून येतात. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या प्रदेशातील लोकांच्या काही लकबी किंवा त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये [मनोमय संस्कृती] यांच्याबद्दल काही स्थूल, बरेवाईट समज आपल्यात घर करून आहेत. याचे कारण असे की, महाराष्ट्रातील जे वर उल्लेखिलेले स्थूल विभाग पडतात. त्यांच्यामध्ये काही भौगोलिक म्हणजेच नैसर्गिक वैशिष्ट्ये आढळून येतात. सभोवतालच्या नैसर्गिक वातावरणामुळे त्या त्या विभागातील जीवनपद्धती आकार घेऊ लागतात आणि त्यातूनच प्रादेशिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये दृढ होत जातात.

Reviews
There are no reviews yet.