Description
त्र्यंबक शंकर शेजवलकर (1895-1963) हे मराठीतील एक थोर इतिहासकार. ‘पानिपत’वरील त्यांचे इंग्रजी-मराठी ग्रंथ इतिहास संशोधनातील वस्तुपाठ मानले जातात. श्री शिवछत्रपति संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने या त्यांच्या ग्रंथाला साहित्य अकादेमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. संशोधनाची उग्र तपस्या आणि अन्वयार्थाची दिव्यदृष्टी यांचा मिलाफ
ज्यांच्यामध्ये झालेला आहे, असे प्रतिभावंत इतिहासकार हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच असतात. मराठी इसिहासलेखन परंपरेतील अशी दोन उत्तुंग शिखरे म्हणजे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि त्र्यंबक शंकर शेजवलकर. प्रज्ञा व प्रतिभा, व्यासंग व विश्लेषक बुद्धी, तळमळ व त्याग आणि विक्षिप्तपणा व वादग्रस्तता हे या दोघांचेही समान विशेष. त्यांच्या लेखनात चुका आणि विसंगती नाहीत, असे नाही. त्यांची सर्व मते आपल्याला पटतील, असेही नाही. मात्र त्यांच्या स्वयंप्रज्ञ व सर्जनशील इतिहासदृष्टीविषयी फारसे मतभेद संभवत नाहीत. यापैकी इतिहासाचार्य राजवाडे यांच्या निवडक लेखांचा संग्रह साहित्य अकादेमीने पूर्वीच (1958) प्रकाशित केला होता. आता निवडक शेजवलकर वाचकांच्या हाती ठेवत आहोत. शेजवलकरांच्या प्रचंड लेखनसंभारातील निवडक मराठी मौक्तिकांची माला गुंफण्याचा हा एक प्रयत्न.
या लेखनसंग्रहाचे संपादक राजा दीक्षित ह्यांनी शेजवलकर-दर्शन घडवण्यासाठी त्यांचे पंधरा लेखनांश निवडून आपल्या विवेचन प्रस्तावनेद्वारा शेजवलकरांच्या कामगिरीवर चिकित्सक भाष्य केले आहे.
Reviews
There are no reviews yet.