Description
मराठी संतकवयित्रींची कविता हा महाराष्ट्रीय जीवनाचा एक श्रेष्ठ सांस्कृतिक वसा आणि वारसा आहे. त्याची नाळ एकीकडे स्त्रीगीतांशी जुळते, तर दुसरीकडे आजच्या स्त्रीवादी साहित्यपरंपरेशीही त्याचा अनुबंध जुळवता येतो. भौतिकाचे बंधन झुगारून आत्मप्रत्ययाचे बोल ह्या कवितेने जनसामान्यांप्रत नेले, त्यासाठी बोलभाषेचा, लोकभाषेचा जो अप्रतिम वापर रूढ केला त्यामुळे मराठी भावकविता संपन्न झाली. अध्यात्मचिंतनाबरोबरच ह्या कवितेत एक अंगभूत गेयता आढळते आणि त्याबरोबरच सामाजिक जाणीवा, बंडखोरी आणि आर्तताही मुखर होते.
प्रस्तुत पुस्तकात बाराव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या संतकवयित्रींची विशेष संदर्भासह नोंद घेण्यात आली आहे. शोषितांचा अंतःस्वर ठरेल अशा ह्या संतकवयित्रींसंबंधीच्या अभ्यासग्रंथाचे संदर्भमूल्य निश्चितच मोठे आहे.
मराठी संतकवयित्रींचा इतिहास या अभ्यासग्रंथाचे संपादक विद्यासागर पाटंगणकर हे मराठी संत व भक्तिसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक व जाणकार म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या महत्त्वाच्या प्रकाशनांमध्ये अभंगवाणी: ज्ञानेश्वर ते तुकाराम, सगनभाऊच्या लावण्या-पोवाडे, लीळाचरित्र एकांक, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास इ. पुस्तकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
Reviews
There are no reviews yet.