Description
नारायण मेघाजी लोखंडे यांनी एकाच वेळी कामगार आणि शेतकऱ्यांचा लढा हाती घेऊन शोषित जात – वर्गाच्या बाजूने अभूतपूर्व वैचारिक व संघटनात्मक बांधणी केली होती आणि या बांधणीच्या बळावरच शोषित मागासजातीय समाजाचे जातीविरोधी समतावादी लढे आणि शेतकरी, शेतमजूर, कुळं – कामगारांचे वर्गीय लढे एकत्र लढले जाऊ शकतात, याचे कम्युनिस्टपूर्व उदाहरण या देशात निर्माण करून ठेवले होते. या तिन्ही पातळ्यांवर लढताना व काम करताना त्यांना कोणत्याच वर्गीय व जातीय जाणीवा त्यांच्या कार्यात आडव्या येत नसल्याचे जाणवले नव्हते. उलट त्यांच्या सत्यशोधकी विचारसरणीमुळे या तिन्ही पातळ्यांवर ते यशस्वीपणे कार्य करू शकले होते. आपल्या देशात १९२० नंतर आलेल्या कम्युनिस्ट चळवळीला मात्र नारायण मेघाजी लोखंडेंनी जपलेला वर्गीय -जातीय संघर्षाचा हा सांधा टिकवून ठेवता आला नाही. म्हणून उत्तरोत्तर कम्युनिस्ट चळवळ एकांगी बनत जाऊन आज या चालवळी मृतप्राय झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. योग्य विचारसरणीशिवाय कोणताही लढा यशस्वीपणे लढला जाऊ शकत नाही. कम्युनिस्टांची केवळ वर्गीय विचारसरणी हि आपल्या देशात ज्या प्रमाणे अपयशी ठरत आहे; त्याचप्रमाणे दलित चळवळीची निव्वळ जातीय विचारसरणीही आपल्या देशात मूळ धरू शकत नाही, हे आता स्पष्ट झालेले आहे. अशा वेळी जातीय व वर्गीय या दोन लढ्यांना एकत्र ठेवणारा सत्यशोधक विचार आपल्या देशात यशस्वी होऊ शकतो हा नारायण मेघाजी लोखंडेंच्या चळवळीचा निष्कर्ष होता व त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या विविध वर्गीय व जातीय चळवळींना तो पुरेपूर सिद्ध झालेला दिसून येतो.
Reviews
There are no reviews yet.