महात्मा जोतीराव फुले म्हणजे क्रांतिसूर्य. त्यांच्या कार्याने आधुनिक भारताच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासात आमूलाग्र बदल झाले. मुळात अनाथ असलेला, फुले दाम्पत्यांचा दत्तकपुत्र म्हणजे यशवंत, सामाजिक रोष, बहिष्कार, अवहेलना, अपमान, भाऊबंदकी यांना मोठ्या धीराने तोंड देत यशवंत शिकले, डॉक्टर झाले. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल ठेवून समाजसेवेचे व्रत अंगीकारले. कौटुंबिक जीवनातील अनेक आघात पचवून समाजकार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले, परंतु प्रथम पत्नीचे अकाली निधन, प्लेगच्या साथीत महामाता सावित्रीबाईंचा मृत्यू आणि तीव्र झालेला जातिबहिष्कार या कारणांनी डॉ. यशवंतराव फुले यांचे कार्यकर्तृत्व प्रकाशात आले नाही. बिकट परिस्थितीला तोंड देत त्यांनी केलेला संघर्ष बोलका आणि प्रेरणादायी आहे. राजाराम सूर्यवंशी यांनी प्रस्तुत पुस्तकातून डॉ. यशवंतराव जोतीराव फुले यांचे कार्य आणि फुले दाम्पत्याच्या कौटुंबिक जीवनाचा इतिहास अधोरेखित केला आहे. अवघ्या ३६ वर्षाच्या कार्यकाळातला डॉ. यशवंतरावांच्या वाट्याला आलेला संघर्षमय जीवनप्रवास मुळातून वाचावा असाच आहे.

Reviews
There are no reviews yet.