प्रिय मधुश्री
तू काही माझी फक्त पत्नी आणि गृहिणी नव्हतीस. तू माझी प्रेयसी, सखी, मैत्रीण, सहचरी आणि प्रेरिका होतीस. एवढंच नव्हे, तर माझ्या जीवनाची आधारशिला होतीस आणि आहेसही. मी आज तुझा निरोप घेताना तुला शब्द देतो, की मी जीवनाशी कधीही द्रोह करणार नाही. तू दिलेला माझ्या जीवितकार्यावरच्या निष्ठेचा झेंडा कदापि झुकू देणार नाही. बहुजन समाजाच्या ‘स्वत्वा’साठी निष्कपट अंतःकरणानं, विवेकी बुद्धीनं आणि श्रमोत्सुक शरीरानं मला शक्य ते सर्व काही करीन. या देहात अखेरचा श्वास असेपर्यंत बहुजन समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक इ. विविध प्रकारच्या स्वातंत्र्यासाठी माझी लेखणी आणि वाणी झिजवीन. भारतीय समाजातल्या सर्व व्यक्तींचं व समूहांचं जीवन प्रसन्नतेनं फुलावं, त्यांच्या जीवनात आनंदाचा आणि प्रेमाचा उत्सव साजरा व्हावा, त्या सर्वांची प्रतिभा शक्य तितक्या सर्व अंगांनी विकसित व्हावी आणि समग्र भारतीय समाज उन्नत, समतेवर विश्वास ठेवणारा आणि ‘माणूस’ म्हणवून घेण्यास खन्या अर्थानं पात्र व्हावा, यासाठी मी माझ्या कुवतीनुसार अखेरपर्यंत कार्य करीत राहीन. तुझ्या वियोगाच्या दुःखानं आलेलं एकाकीपण माझ्या हृदयाच्याही हृदयात खोलवर माझ्यापुरतंच लपवून ठेवीन. त्याची थोडीही सावली इतरांवर आणि माझ्या स्वीकृत कर्तव्यावर पडू देणार नाही. श्री, एक प्रकारे कर्तव्याच्या आकाशात पुन्हा एकदा उंच उंच झेप घेण्याची प्रतिज्ञा मी करीत आहे आणि तरीही तुझा आधार तुटलेल्या माझी ही प्रतिज्ञा म्हणजे जणू काही पंख कापलेल्या पक्ष्यानं आकाशात झेपावण्यासाठी केलेती केविलवाणी धडपड आहे. असंच मला वाटतंय्. शब्द देणं सोपं आहे. पण त्या शब्दाचं पालन करण्यासाठी बळ कुठनं आणू? आणि तरीही तुला सांगतो, की तुझ्या आठवणींचेच पंख घेऊन जेवढं झेपावता येईल, तेवढं झेपावेन मी।

Reviews
There are no reviews yet.