Description
भाग दोनमध्ये प्रामुख्याने गोदावरी नदीच्या काठाने विकसित झालेली जी स्थाने अष्टांगे म्हणून ओळखली जातात, त्या महत्त्वपूर्ण स्थानांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. विशेषत: दासगणू महाराजांनी लिहिलेल्या गोदा माहात्म्यात ही स्थाने नोंदवली असून ती परंपरेने ज्ञात आहेत. गोदावरीचे शीर्षस्थान, मुखस्थान, हृदयस्थान, कंठस्थान, नाभिस्थान, कटिस्थान, जानुस्थान व चरणकमल अशा क्रमाने ही स्थाने त्र्यंबकेश्वरपासून राजमहेंद्रीपर्यंत दाखवली जातात. या स्थानांविषयी प्रचलित असलेल्या पौराणिक कथा, स्थलमाहात्म्य, लोकस्मृती आणि रूढ परंपरा यांचा मागोवा घेतला असून त्या स्थानांवर उभी असलेली स्मारके, पुरातत्त्वीय अवशेष व अभिलेख यांच्या आधारे सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेतला आहे.
मध्ययुगीन काळात निसर्ग चक्र, निसर्गत: होणारे परिवर्तन, विशेषत: मध्ययुगाच्या प्रारंभापासून होणारी राजकीय स्थित्यंतरे यांचा परिणाम म्हणून येथील मूळ परंपरा, स्मारके नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच काही बदल जाणीवपूर्वक घडवले गेले. तथापि, इसवीसनाच्या प्रारंभिक काळापासून येथे मानव स्थिरावला आणि त्याने सांस्कृतिक जीवनाचे विविध टप्पे विकसित केले. काही धर्मपंथ, परंपरा यांच्यात झालेला अंतर्गत संघर्ष व समन्वय यांच्यातून एकात्म जीवन उभे करण्याचा प्रयत्न झाला. आमचे ऋषी व आचार्य यांनी केलेले प्रयत्न व रूढ केलेले संस्कार या सगळ्यामुळे परकीय आक्रमणे तसेच इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांच्या वादळ-वाऱ्यातही इथल्या मूलभूत श्रद्धा नष्ट झाल्या नाहीत. परिवर्तन होत असलेल्या काळात, विशेषत: इस्लामी कालखंडात एक स्तब्धता (थंड गोळ्याप्रमाणे) निर्माण झाली.

Reviews
There are no reviews yet.