Description
प्रत्येक भाषा व्याकरणाच्या नियमांनी बद्ध असते. त्यामुळे तिला एक प्रमाणशीर व अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त होते. मराठी भाषा दर बारा कोसांनी बदलते, प्रादेशिक क्षेत्रांनुसार तिच्या उच्चारात फरक पडतो. तसेच स्थानिक बोली भाषांचा देखील तिच्यावर प्रभाव पडतो. हे जरी खरे असले तरी, बोलण्याची भाषा बदलू शकते. परंतु, लेखनाची भाषा बदलता येत नाही. कारण आपण जसे बोलतो तसे लिहित नाही. प्रशासकीय, वैधानिक, विधिविषयक, शास्त्रीय व तांत्रिक क्षेत्रातील लेखन करताना, अचूकता, अर्थपूर्णता व नेमकेपणा या कसोट्या पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होत नाही. एका शब्दाचे अनेक अर्थ निघत नाहीत. अन्वयार्थ लावणे सुलभ होते. या कसोट्या व निकष प्रमाणलेखन नियमावलीमध्ये सारांश रुपाने अंतर्भूत केलेले आहेत. अक्षर हे सुंदर असून चालत नाही, तर शुद्धही असावे लागते. सुंदर हस्ताक्षर हा भाषेचा दागिना आहे तर शुद्ध अक्षर हा भाषेचा आत्मा आहे. प्रमाणलेखन नियमानुसार लेखन करण्याच्या दृष्टीने, प्रमाणलेखन नियमावली उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल.

Reviews
There are no reviews yet.