Description
हे लेखन प्रा. दीक्षितांच्या आक्षेपांना उत्तर देण्याच्या निमित्ताने घडले असले, तरी ते तेवढ्यापुरतेच मर्यादित मात्र नाही. हे लेखन प्रा. दीक्षितांच्या आक्षेपांना उत्तरे देता देता भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील असंख्य घटनांचे विवेचन करणारे आहे. वाचकांनी प्रामुख्याने त्या दृष्टीनेच त्या लेखनाकडे पहावे, अशी माझी विनंती आहे. सर्वसामान्य माणसांचा एक प्रतिनिधी या नात्याने भारतीय संस्कृतीचा परंपरागत इतिहास वाचताना त्या इतिहासाच्या विकृत व अन्यायी स्वरूपामुळे माझ्या काळजावर पुनःपुन्हा घाव घातले गेले आणि त्या घावांच्या वेदनांनी डोळे उघडल्यामुळे मी या पुस्तकाला प्रस्तुत नाव दिले.
भारतीय संस्कृतीचा इतिहास घडत असताना वैदिकांनी येथील बहुजन समाजावर अपार अन्याय केलेच. पण तो इतिहास लिहितानाही प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचे वस्तुनिष्ठ वर्णन करण्याऐवजी आपल्या लहरीनुसार व आपल्या हितसंबंधांसाठी आपल्या ‘सख्ख्या’ पूर्वजांना सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय द्यायचे आणि वाईट गोष्टींचा उपका इतरांच्या माथी ठेवायचा अशी चलाखी केली. इतिहास लिहिताना न्यायाला अन्याय आणि अन्यायाला न्याय्य ठरवून टाकण्याची किमया त्यांनी केली. स्वतःच्या अत्यंत दुष्ट पूर्वजांनाही सज्जन म्हणून आणि बहुजनसमाजातील अत्यंत सत्प्रवृत्त व सदाचरणी लोकांनाही दुष्ट म्हणून रंगवण्याचे काम त्यांनी केले. खरेतर अशा प्रकारची ‘पापे’ त्यांनी किती केली, त्यांची गणतीच नाही. म्हणूनच त्यांनी सांगितलेल्या इतिहासाकडे संशयाने पाहणे, ही भारताचा इतिहास नीट समजून घेण्यासाठी असलेली अत्यंत महत्त्वाची अशी पूर्व-अट आहे, असे मी मानतो.
ठराविक लोकांनीच डोके वापरायचे, ही ऋग्वेदाच्या पुरुषसूक्ताने घातलेली मर्यादा आमच्या शंभर-दीडशे पिढ्यांचे खच्चीकरण करायला कारणीभूत झाली. इतक्या पिढ्यांतील आमचे मायबाप मूक श्रोते राहिले. शोषकांच्या ‘कर्तबगारी’चे मूक, असहाय प्रेक्षक राहिले. शोषकांनी बोलावे आणि आमच्या मायबापांनी ते ऐकावे, तेच खरे मानावे, असे युगानुयुगे घडले. पण आता आम्ही नुसते श्रोते, नुसते प्रेक्षक राहणार नाही. आता आम्हीही बोलू आणि त्यांना ऐकावे लागेल. या कालखंडात आमच्या बहुसंख्य पूर्वजांना वाचताही आले नाही, तर लिहिता कुठून येणार? आता मात्र आम्ही वाचक तर होऊच, पण नुसते वाचक म्हणून थांबणार नाही. आता आम्ही लिहू आणि आम्ही लिहिलेले त्यांना वाचावे लागेल. त्यांनी सांगायचे आणि आम्ही ते जसेच्या तसे खरे मानायचे, हे आता घडणार नाही. आता आम्ही त्यांच्या बोलण्यातील खऱ्याखोट्याची तपासणी करू. इतिहासाचा, वर्तमानाचा अन्वयार्थ लावू. भविष्यासाठीचे निर्णय घेऊ. आमच्या डोळ्यांनी पाहू, आमच्या कानांनी ऐकू. आमच्या बुद्धीने विचार करू. आमच्या पूर्वजांनी इतिहास घडवला होता, पण त्यांना तो लिहिता आला नव्हता. आम्ही आता इतिहास घडवूही आणि लिहूही.
आमच्या शोषकांनी स्वतःच्या हितसंबंधांसाठी सांगितलेले समाजशास्त्र, तत्त्वज्ञान वगैरेंना आम्ही आमचे समाजशास्त्र, तत्त्वज्ञान वगैरे म्हणणार नाही. म्हणूनच त्यांनी सांगितलेल्या खोट्या इतिहासाला आम्ही आता चूड लावीत आहोत. आमच्या मेंदूतील गुलामीची जळमटे आम्ही जाळून टाकीत आहोत. वैदिकांनी आमच्या धडावर पुनःपुन्हा कलम करून चिकटवलेली आणि शेकडो पिढ्या तिथे चिकटून बसलेली आमच्या शोषकांची डोकी चार्वाक, गौतमबुद्ध, म. फुले, छ. शाहू, डॉ. आंबेडकर वगैरेंनी छाटली आहेत आणि त्यांनी आमच्या धडावर आता आमचीच डोकी पुन्हा प्रस्थापित केली आहेत. आता या पुढचे काम आम्ही करीत आहोत आणि आमच्या पुढच्या पिढ्याही करतील. या धडपडीत आमचे काही चुकेलही; पण आमच्या चुका दुरुस्त करण्याचे काम पुढच्या पिढ्या नक्कीच करतील !

Reviews
There are no reviews yet.