Description
धर्मसूत्रे हे वैदिक ब्राह्मणांचे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ होत. ते वैदिकांनी भ्रष्ट केलेल्या पुराणांसारखे चिल्लर वा थिल्लर ग्रंथ नव्हते. एकीकडून त्यांच्यामध्ये ब्राह्मण नावाच्या ग्रंथांचे सार आले आहे, तर दुसरीकडून मनुस्मृतीसारख्या स्मृतिग्रंथांमध्ये त्यांचा अर्क उतरला आहे. हे ग्रंथ म्हणजे एकीकडून ब्राह्मण ग्रंथांची विष संतती आहे, तर दुसरीकडून ते मनुस्मृतीच्या ग्रंथांचे कुटिल आईबाप आहेत. वैदिकांचे आचार- विचार रूढ़ी, प्रथा, कायदे यांचे ज्ञान होण्याच्या दृष्टीने या ग्रंथांचे स्थान फार वरचे आहे वैदिकांचा अहंकार, त्यांचा श्रेष्ठत्त्वाचा गंड, त्यांची अमानुष क्रूरता, त्यांच्या मनाचा हलकेपणा, त्यांची असंस्कृत वृत्ती इत्यादी दुर्गुणांचे दर्शन या ग्रंथांमधून अगदी लख्खपणे घडते. ज्यांना भारताचा खराखुरा समाजशास्त्रीय इतिहास जाणून घ्यायचा असेल, त्यांनी हे ग्रंथ जरूर नजरेखालून घातले पाहिजेत.
या ग्रंथांनी बहुजनांमधील बहुसंख्य लोकांचे मानसिक व बौद्धिक खच्चीकरण केले. त्यांना आरपार गुलाम बनवले. त्यांची संवेदना बोथट व बधिर करून टाकली. त्यांची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता नष्ट केली. त्यांच्या शेकडो पिढ्यांच्या प्रतिभेचा मोहर झडेल, गळून पडेल, अशी व्यवस्था केली. या धर्मग्रंथातील नियमांच्या विषारी विळख्यात बहुजनांमधील असंख्य व्यक्तींचे प्राण गुदमरले, त्यांचे सत्त्व हरपले, त्यांची ससेहोलपट झाली. त्यांना लाचारीचे जिणे जगावे लागले आणि तरीही त्यांनी या ग्रंथांना पवित्र व पूज्य मानले. आज हे नियम वाचले, की रक्तामध्ये लाव्हारस उसळू लागतो, संतापाचा आगडोंब उफाळून येतो, तळपायाची आग मस्तकाला जाते. अशाही स्थितीत विवेक व संतुलन गमावता कामा नये वा सूडाची भावना प्रज्वलित करता कामा नये, हे अगदी खरे आहे. तथापि हा संयम बाळगताना निदान या ग्रंथांबरोबर आपली नाळ असल्याचा जो भ्रम बहुजनांच्या डोक्यात भरण्यात आला आहे, तो ट्री छाटून टाकला पाहिजे. या ग्रंथांच्या आणि त्यांनी सांगितलेल्या धर्माच्या कचाट्यातून सुटून मोकळेपणाने श्वास घेतला पाहिजे. त्याबरोबर माणसाला माणूस म्हणून उभ्या करणाऱ्या, त्याची प्रतिभा फुलवणाऱ्या, एका ह्रदय, निकोप, अन्यायरहित आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती करणाऱ्या नव्या व्यवस्थेला जन्म दिला पाहिजे. धर्मसूत्रांसारखा ग्रंथांच्या गुलामगिरीतून सुटका करून घेऊन स्वत:च्या विवेकाच्या आधारे जीवनाची नवी सूत्रे रचली पाहिजेत ! समाज धारणेची नवी गीते लिहिली पाहिजेत ! हे सर्व घडावे, हाच या लेखनामागचा उद्देश आहे .
Reviews
There are no reviews yet.