Description
संत तुकाराम महाराजांना जगदगुरु म्हटले जाते. त्यांनी विश्वाला महामानव बनण्याचा मूलमंत्र दिला. त्यांच्या अभंगाच्या द्वारे त्यांनी वैश्विक कल्याणाची भूमिका मांडली. त्यामुळे त्यांच्या अभंगांनी सर्वांना भुरळ पडते. जगदगुरु तुकोबारायांच्या गाथेतील अतिशय महत्त्वपूर्ण वीस अभंग शोधून त्यांचा समावेश या पुस्तकात केले आहे. या अभंगांचे भाष्य थोड्या शब्दांत मार्मिकपणे केले आहे. यामध्ये मनाची प्रसन्नता, प्रयत्नवाद, अंधश्रद्धा, कर्मकांड यावरती खूपच सुंदर व अतिशय थोडक्या शब्दांत प्रकाश टाकला आहे.
‘अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी ।
तैसे संत जगी । क्रिया करनी दाविती अंगी ।।’
जनमानसावर संत साहित्याचा फार मोठा प्रभाव आहे. भक्तीपंथात विठ्ठलभक्तीला आणि संत साहित्यात तुकाराम या महामंत्राला वेगळे महिमान आहे. भाव, भावनांचा अत्युच्च कल्लोळ म्हणजे भक्ती, विश्वास; श्रद्धांचे परमोच्च शिखर म्हणजे संत भक्तीतील तारतम्य होय. तारतम्य, तादात्म्य व विवेकाचा त्रिवेणी प्रवाह म्हणजे संत तुकाराम. त्यांचे अभंग त्यांच्या आयुष्यातील अनुभूतीची अभिव्यक्ती आहे. या अभिव्यक्तिने सामान्यजनांच्या सुख दु:खाला फुंकर घातली. आयुष्याच्या तिवाट्यावर पथदर्शक फलक म्हणजे संतांचा उपदेश. हा उपदेश संतांच्या कळवळ्याने, मातेच्या ममतेने तुकाराम महाराजांनी आपल्या कीर्तनातून सांगितला आहे. संसार सुखाचा करण्याचे इंगित सांगत असताना कडकडीत वैराग्याच्या वाटेची तुकाराम महाराजांनी आध्यात्मिक साधनेला पोषकता असली पाहिजे, हे सांगितले आहे. जीवन समृद्ध, संपन्न बनवायचं, तर चतुरस्त्र अभ्यासाने दुर्गुणांची जाणीव होवून त्यागाची तयारी व सद्गुणांचा परिपोष होणे गरजेचे असते.
Reviews
There are no reviews yet.