Description
कोणताही विचार शून्यातून निर्माण होत नाही. त्याला त्याच्या पर्यावरणाचे मजकूर असतात. त्याला भारतीय तत्त्वज्ञानही अपवाद नाही. टोळी अवस्थेतील गूढ भौतिकवादा (Proto-Materialism) तून उदयास आलेल्या भौतिकवादाविरुद्ध कल्पनावादा (Idealism) तील संघर्ष प्राचीन सामाईक उत्पादनाच्या वितरणपद्धतीतील अन्याय्य हक्कावरून निर्माण होतो. टोळी अथवा गणाच्या सामाईक उत्पादनावर टोळी/गणप्रमुख आणि पुरोहितसंस्था यांनी आपले विशेष माहात्म्य प्रस्थापित करून सर्वसाधारण सभासदांपेक्षा आपला अग्रिम आणि विशेष हक्क प्रस्थापित करण्याने आणि इतरांना कमी लेखून त्यांच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवण्याने संघर्षाला खरी सुरुवात होते. त्याकरिता ते चमत्कार, जादूटोणा (यातुधानविद्या) इत्यादि अतिमानवीय शक्तीचे साहाय्य घेताना दिसतात. कारण की त्यामुळे टोळी वा गणातील पूर्वापार चालत आलेली समानतेची भावना, ‘समदृष्टी’ म्हणजेच प्राचीन धम्म मोडीत काढला जातो. व्यक्तिमाहात्म्य वाढविण्याकरिता पुढे चमत्काराचे नवनवीन मार्ग शोधले जातात. चमत्कारातील खुब्या बहुजनांना जाणता येऊ नयेत म्हणून त्यांचे अज्ञान जोपासण्याचे कार्य धार्मिक ग्रंथांनी केले आहे. त्यामुळे उत्पादनाच्या कार्यात त्यांना सतत गुंतवून ठेवता येते. सतत चालणाऱ्या टोळीयुद्धामुळे हरलेल्या अथवा शरण आलेल्या व्यक्तिसमूहाकडून तर पुढे उत्पादनाची कामे हक्काने करवून घेतली जाणे अगदी स्वाभाविक ठरते. उत्पादनात भरमसाठ वाढ झाल्याने हा अत्यल्पसंख्य प्रभुत्वधारी वर्ग स्वतंत्र सेना उभारू शकला. त्यामुळे युद्धाला अधिक चालना मिळाली व यातूनच राजेशाही व पुरोहितसंस्था एक-दुसऱ्याच्या साहाय्याने अधिकच बलिष्ठ होत गेल्या. कित्येक राजेशाही वंश युद्धखोरीने नष्ट झालेत, पण पुरोहितसंस्था आणि त्यांच्या अवतीभवती एकत्र झालेला तथाकथित उच्चभ्रू वर्ग मात्र आपले अस्तित्व शाबूत राखण्यात कमालीचा यशस्वी ठरला आहे. म्हणून तर वेदाला पुरोहितवर्गाचा सिद्धांतवजा जन्म परमपुरुषाच्या मुखातून पसरवावा लागला.
Reviews
There are no reviews yet.