प्रिय वाचक व ग्रंथप्रेमी
बांधवांना नमस्कार,
२३ मार्च, २०१२ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी ‘सनय’ प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कवी परमानंद यांनी ‘शिवभारत’ या ग्रंथात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना लावलेल्या ‘सनय’ या विशेषणाला घेऊन ‘सनय प्रकाशन’ या नावाने प्रकाशन संस्था स्थापन करण्यात आली. छत्रपती शिवराय व बहुजन महामानवांच्या विचारांना शिरसावंद्य मानून प्रकाशन संस्था ‘न्याय, स्वातंत्र, समता आणि बंधुभाव’ या तत्त्वांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पुस्तक प्रकाशन व वितरण क्षेत्रात कार्य करते.
सनय प्रकाशन ही संस्था भारतात स्वतंत्रपणे काम करणारी प्रकाशन संस्था असून समाज व वाचकांपासून दुर्लक्षित राहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन व वितरण करणे याचबरोबर तळागाळातील समाजबांधवांपर्यंत पुस्तकांच्या माध्यमातून वैचारिक व सत्य विचार पोहोचवण्याचा वसा प्रकाशन संस्थेने घेतलेला आहे. विविध विषयांवरील दर्जेदार वैचारिक पुस्तके मराठी भाषेत प्रकाशित करणे, तसेच इतर हिंदी व इंग्रजी ज्ञानभाषेतील वैचारिक, विज्ञाननिष्ठ पुस्तके मराठी भाषेत अनुवादित करणे हा प्रकाशन संस्थेचा मानस आहे.
फ्रेंच तत्त्वज्ञ आणि विचारवंत असलेल्या रेने देकार्त यांच्या उक्तीप्रमाणे “ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात जे सत्य आणि असत्य आहे ते एकमेकांपासून अलग करणे” हे प्रकाशन संस्थेचे अंतिम ध्येय आणि उद्दिष्ट आहे. ‘सत्य हेच या जगात अंतिम शाश्वत आहे’, प्रागतिक, पुरोगामी, सत्यनिष्ठ अशा नव्या काळाचे प्रतिबिंब आपल्या कार्यातून आणि कृतीतून (प्रकाशन आणि वितरण) उमटवणारी व या विचारधारेस कटिबन्ध असलेली एकमेव प्रकाशन संस्था म्हणजे ‘सनय प्रकाशन’ होय. चला! आपणही या विचारधारेचे पाईक होऊ या .
धन्यवाद!
© 2024 Sanay Prakashan. All Rights Reserved.
Design & Developed by PitchTeQ