Description
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्र
{ ख़ास ‘जनते’ करिता }
लंडन, 15 ऑक्टोबर 1931
26 सप्टेंबरला मायनॉरिटीज सब कमिटीची (अल्पसंख्यांक वर्गीय पोट कमिटीची) बैठक सुरू व्हावयाची होती. हा दिवस जवळ जवळ येऊन राहिला होता. एक दिवस श्री. देवीदास गांधी ( गांधीजींचे चिरंजीव) मजकडे आले आणि मला म्हणाले की माझे वडील तुम्हाला भेटू इच्छितात. मी बरे म्हटले व सौ. सरोजनी नायडू यांच्या बिरहाडी आधी ठरलेल्या वेळी व संकेतानुसार गांधीजींची मी भेट घेतली. आपल्या नेहमीच्या पद्धतीने ते मला म्हणाले ‘सांगा तुम्हाला काय पाहिजे ते ?’ आम्हाला काय पाहिजे हे यापूर्वी इतक्या स्पष्ट व जाहीरपणे सांगण्यात आले होते की तोच तो प्रश्र्न पुन: पुन: विचारला जावा व तीच ती उत्तरे पुन: पुन: देण्या-घेण्याची वेळ यावी ही गोष्ट काही विशेष समाधानकारक अगर आशाजनक अशी नव्हती ; तरीपण अस्पृश्यांच्या वतीने व त्यांच्याकरता मी काय मागतो व ते का मागतो याची यथोचित कल्पना गांधीजींना अद्यापही झाली नसल्यास ती करून देण्यात आपले काही बिघडत नाही असा विचार करून मी माझ्या मागण्यांचा सविस्तर व समप्रमाण पाढा गांधीजींपुढे वाचून दाखविला. संध्याकाळचे 8 वाजेपासून रात्रीच अकरा वाजेपर्यंत म्हणजे बरोबर तीन तास मुलाखत चालली होती. गांधीजी सूत काढित होते व माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. मधून मधून ते मला प्रश्नही विचारीत. आपल्या मतांचा थांग त्यांनी मला लागू दिला नाही; पण माझे म्हणणे काय आहे हे त्याना स्पष्टपणे कळावे असा माझा हेतु असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे मला माझे विचार झाकून ठेवण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. वास्तविक पहाता गांधीजींनीही माझ्याशी तशीच मोकळ्या मनाने चर्चा करावयाला पाहिजे होती. प्रतिपक्षाचे विचार त्यांच्या तोंडून वदवून घ्यावे पण आपल्या विचारांचा ठाव मात्र त्याला कळू देऊ नये ही चाणक्यनीती एरव्ही मुत्सद्दीपणाचे लक्षण समजली जात असेल, पण या प्रसंगी ती अप्रासंगिक व अकारण होती. माझ्या मनात असते तर हा डाव मलाही खेळता आला असता. पण त्यांत काय साध्य होणार होते? माझ्या मागण्यांना विरोध करणेच काँग्रेस आदन्येनुसार गांधीजींनी प्राप्त होते असे जरी घटकाभर गृहीत धरले, तरी तसे देखील माझ्याशी मोकळ्या मनाने व विश्वासपूर्वक चर्चा करून त्यांना करता आले असते. त्यांचा विरोध मी मानला नसता पण त्यांच्या विरोधाची कारणे मी सहानुभूतीपूर्वक समजू शकलो असतो. पण खेदाची गोष्ट ही की मी दाखविला तसा मोकळेपणा गांधीजींनी याही प्रसंगी व्यक्त केला नाही. माझे सारे म्हणणे ऐकून घेतल्यावरही आपले म्हणणे काय आहे व ते तसे का आहे याचा खुलासा गांधीजींनी केला नाही. मी त्यांना तसे करावयाला लावले असते पण सरोजिनीबाईने मला खुणेने काही न बोलण्याविषयी सुचविले व ” र्व काही तुमच्या मनाप्रमाणे जुळून येईल पण ज़रा दमाने घ्या ” असे कायसे त्या पुटपुटल्या. मी ही मग गांधीजींचे हृदगत खुद्द त्यांच्या तोंडून तेथल्या तेथे वदवून घेण्याचा माझा विचार सोडून दिला. वेळही फार झाला होता. सरोजिनीबाईही उपाशी होत्या. अकरा वाजता गांधीजींचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. माझ्या आधी बॅ. जिनाशी त्यांची मुलाखत झाली होती व मुसलमानांच्या हक्कासंबंधीचा वाटाघाट गांधीजींनी जीनाशी केली हे माला मागाहून समजले.
Reviews
There are no reviews yet.