Description
नव्वदच्या दशकानंतर जहाल हिंदुत्ववादाने मांडलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची महाराष्ट्रात लोकप्रियता वाढली, आणि स्थानिक अधिकारांचे पुरस्कर्ते म्हणून शिवसेनेसारखे गट पुढे सरसावले. जागतिकीकरणाच्या काळात शिक्षण, नोकरी, व्यवसाय, माध्यमं अशा एकूण सर्व सार्वजनिक क्षेत्रांत इंग्रजीचे महत्त्व आज बहुपटीने वाढले. भारतभर दलित चळवळीत शहरीकरणाचे, आणि इंग्रजी शिक्षणाचे राजकीय महत्त्वही वाढले. नेमाडे यांची टीका शहर-इंग्रजी-प्रगती-जागतिकीकरणाचे समीकरण, आणि हिंदुत्वाचे राष्ट्रवादी, धार्मिक केंद्रीकरण, या दोन्ही प्रवाहांना पर्याय मांडण्याकडे वळली आहे. हिंदूतील इतिहास-सांस्कृतिक कल्पना याच प्रयत्नाची परिणती आहे, आणि कादंबरीला मिळालेले दोन्ही टोकांचे, पण उत्साही प्रतिसाद नेमाडे यांच्या प्रादेशिक प्रश्नांशी साधलेल्या दीर्घ संवादाची साक्ष देतात. शेवटी, अत्यंत पोलराइजिंग का होईना, कळीच्या राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक चर्चाना मराठीत जिवंत ठेवण्यात, मराठी राजकीय-सांस्कृतिक चर्चाविश्व समृद्ध करण्यात, नेमाडे यांच्या साहित्यनिर्मितीचा सिंहाचा वाटा आहे. एंगूगी वा थियोंगो या सहप्रवाशाच्या तुलनेत, हेच त्यांच्या देशीवादाचे दीर्घकालीन महत्त्व आणि यश ठरावे.

Reviews
There are no reviews yet.