हिंदू समाजाला शतकानुशतकांपासून जातिव्यवस्थेने विषारी विळखा घातलेला आहे. त्याला तोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण तो तुटता तुटत नाही. जात ही कशी निर्माण झाली, कुणी निर्माण केली आणि तिचे पालनपोषण कुणी केले यावर अनेकांनी संशोधन करून ग्रंथ लिहिले आहेत. जात ही माणसाने निर्माण केली आणि माणसानेच तिचे पालनपोषण केले ही गोष्ट उघड आहे. असे म्हटले जाते की, माणसाने निर्माण केलेली समस्या ही माणूसच सोडवू शकतो. जातीची समस्या मात्र माणसाला सोडवता आलेली नाही. वरचेवर ती क्लिष्ट होत चालली आहे. जातिव्यवस्था ही अभेद्य अशी व्यवस्था आहे. काहींना तिने डोक्यावर घेतलेले आहे तर काहींना तिने पायदळी तुडवले आहे. जे तिच्या डोक्यावर बसलेले आहेत ते तिचा गौरव करतात. जे तिच्या पायाखाली आहेत त्यांना ती नामशेष झाली पाहिजे असे वाटते. जातिव्यवस्थेत माणसाला किंमत नाही, तर ती त्याच्या जातीला आहे. माणूस कितीही कर्तृत्वसंपन्न असो, त्याची जात ही त्याच्या कर्तृत्वापेक्षा मोठी असते.
अस्पृश्यता हे जातिव्यवस्थेचे निकृष्ट असे रूप आहे. तिने समाजाच्या एका मोठ्या भागालाच माणुसकी नाकारली. जात ही जन्माधिष्ठित असल्यामुळे अस्पृश्यांच्या अनेक पिढ्यांचे तिने अमानुषीकरण केले. जातिव्यवस्थेवर अनेकांनी प्रहार केले पण ती अभंगच राहिली. प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ या तिन्ही काळांवर तिने मात केली आहे. या तिन्ही काळात जातिनिर्मूलनाचे प्रयत्न झाले. पण या प्रयत्नांना फारसे यश आले नाही.
Reviews
There are no reviews yet.