Description
चार्वाक ! भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक उमदे आणि विवेकनिष्ठ, परंतु उपेक्षित आणि तिरस्कृत दर्शन. लोकायत हे या दर्शनाचे – म्हणजेच तत्त्वज्ञानाचे आणखी एक नाव. हे चार्वाकदर्शन म्हणजे एका बाजूने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील एक धगधगणारा निखारा. अन्यायावर व शोषणावर जबरदस्त आघात करणारी एक १ स्फोटक आणि जळजळीत विचारसरणी. परंतु दुसऱ्या बाजूने ज्याच्यातून आशावादाचा सुगंध दरवळत आहे, असे एक प्रसन्न, टवटवीत फूल. मानवी जीवनातील माधुर्यावर उत्कट प्रेम करायला शिकविणारी एक जिवंत विचारप्रणाली. पारलौकिक प्रमांच्या पाठीमागे धावण्याऐवजी पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंतचे वास्तव असे मानवी जीवन, याच जगात, निकोप प्रयत्नांच्या द्वारे, निरामय आनंदाने काठोकाठ भरून टाकावे, असे सांगणारी एक इहवादी, जीवनवादी आणि आनंदवादी भूमिका.
चातक, की चकोर ?
चार्वाक हा शब्द एक दर्शन, त्या दर्शनाचा सूत्रकार, त्या सूत्रकाराचा प्रमुख शिष्य, त्या दर्शनाचे अनुयायी इत्यादी वेगवेगळ्या अर्थानी वापरला जातो. पण, खरे तर, आता चार्वाक हे नाव बहुसंख्य भारतीयांच्या आठवणीतही नाही. संस्कृतमध्ये ‘च्’ या वर्णाने सुरू होणारी चातक, चकोर, चक्रवाक अशी काही पक्ष्यांची नावे आहेत. चार्वाक हा असाच एखादा पक्षी आहे काय, असे विचारणारे लोक मला अनेकदा भेटले आहेत. चरक, चाणक्य, च्यवन यांसारख्या ‘च’ काराने युक्त अशी नावे धारण करणाऱ्या व्यक्तींनाच चार्वाक समजणारे लोकही मला अनेकदा आढळले आहेत. तात्पर्य बऱ्याच लोकांना चार्वाक ही नेमकी काय ‘चीज’ आहे, हे माहीत देखील नाही, इतका हा विषय अडगळीत गेलेला आहे.

Reviews
There are no reviews yet.