Description
भारतात कालगणनेचा फरक सोडल्यास महाराष्ट्रात, स्वातंत्र्य संग्रामाची सुरवात प्रथम जेव्हा परकीयांचे आक्रमण झाले तेव्हापासून झाली. हां संग्राम 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त होईपर्यंत अतिशय निकराने आणि अविरत चालू राहिला. ब्रिटिश राजवटीची स्थापना होईपर्यंत स्वातंत्र्यलढ्याचे स्वरुप हे लोकाभिमुख नव्हते याचे कारण तेव्हा हां लढा, आक्रमण करणारी सत्ता आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणारी एतद्देशीय सत्ता यांमधील होता. स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूप हे लोकाभिमुख नव्हते याचा अर्थ त्या लढ्यात लोकांनी किंवा सर्वसामान्य जनतेने भाग घेतला नव्हता असा नाही. लढा या शब्दात जनता हां शब्द अभिप्रेत आहे. 1818 नंतर या लढ्याचे स्वरूप जितके सर्वव्यापी बनले तितके ते 1818 च्या अगोदर नव्हते असा अर्थ वरील विधानातून काढता येईल. या लढ्यात गेल्या शेकडो वर्षांच्या कालखंडात लाखो व्यक्तींनी भाग घेतला आणि एकेकत्याने किंवा संघटित होवुन प्रतिकार केला. त्यामध्ये अनेकांना आपल्या प्राणांचे बलिदान करावे लागले. मालमत्ता गमवावी लागली, तुरूंगवासाच्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि हकनाक आरोपाच्या सावटाखाली लपूनछपून रानावनात जीवाच्या भीतीने भटकत आयुष्य काढावे लागले. ब्रिटिश राजवट सुरू होण्याच्या अगोदरच्या कालखंडातील स्वातंत्र्य समराची आणि तो लढा देणाऱ्या व्यक्तीची नोंद अनेक इतिहास ग्रंथांनी घेतली आहे. त्याची पुनरुक्ती या ठिकाणी करण्याचे कारण नाही. नोंद झाली नाही ती स्वातंत्र्याच्या वेदीवर आत्मबलिदान करणाऱ्या पुढच्या काळातील स्वातंत्र्य सैनिकांची. या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला सीमा नव्हती आणि प्राणपणाने लढून त्यांनी निर्माण केलेल्या अस्मितेला तोड नव्हती. अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाची दखल भावी पिढ्यांना होणे अवश्य आहे. या जाणिवेने इसवी सन 1961 मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा चरित्रकोश तयार करण्याचे काम होती घेतले आहे.
Reviews
There are no reviews yet.