Description
‘सूक्ष्मजंतू’ या विषयावर पुस्तक लिहिणे हे अवघड काम होते; कारण या विषयाचा आवाकाच प्रचंड आहे. तरीही हे शिवधनुष्य प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांनी लीलया पेलले आहे. जीवाणू तसेच विषाणूंचा शोध, रोगजंतूंचे थैमान आणि त्यांचा मानवी इतिहास व संस्कृतीवर उमटलेला अमीट ठसा, याबद्दल अतिशय रसाळ भाषेतून वाचकांशी संवाद साधतानाच हे पुस्तक आपल्याला उपकारक सूक्ष्मजंतू आणि माणूस यांच्यामधल्या जनुकीय नात्याची सहज सुंदर ओळख करून देते. हे पुस्तक शिक्षक, संशोधक, विद्यार्थी तसेच सर्व वाचकांना अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण आहे.
डॉ. जगन्नाथ सातव, निवृत्त सायंटिफिक ऑफिसर, बीएआरसी, मुंबई
सूक्ष्मजीवसृष्टीची उत्पत्तीपासूनची समग्र गाथा ओघवत्या सहज शैलीतून विस्तारानं उलगडताना सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि सहलेखिका डॉ. वैदेही लिमये यांनी लिहिलेलं ‘सूक्ष्मजंतू’ हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवतं. इतकंच नव्हे; तर प्रायॉन्स, बॅक्टेरिओफेजेस आणि अलीकडे सापडलेले महाकाय विषाणू अशा नवनवीन शोधांची रंजक सफर घडवतं. केवळ शास्त्ररज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थीच नव्हे; तर सर्व मराठी वाचकप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणीच आहे.
डॉ. राजीव ढेरे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे
सिद्धहस्त लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांचं ‘सूक्ष्मजंतू ‘ सर्वसामान्य वाचकालादेखील समजेल अशा सहज सोप्या शैलीमधून साकार झालेलं अतिशय सुंदर पुस्तक आहे. सूक्ष्मजंतूंचा इतिहास, विज्ञान आणि मानवी संस्कृतीवर पडलेला प्रभाव यांचा धांडोळा घेताना लेखकद्वयींनी अतिशय परिश्रम घेऊन प्राचीन काळापासून ते २१व्या शतकापर्यंतच्या जंतुविज्ञानाचा सखोल आढावा घेतला आहे. साथीच्या रोगांच्या मुळाशी जाऊन सूक्ष्मजंतूंचा वेध घेणाऱ्या, त्यावर लस शोधून काढणाऱ्या शास्त्रज्ञांच्या चरित्रकथांनी नटलेलं हे पुस्तक वाचकाला गोष्टीचं पुस्तक वाचल्याचा आनंद देतं.
डॉ. वेदवती गुरुराज पुराणिक, माजी वरिष्ठ वैज्ञानिक, एनसीएल, पुणे
ओघवती सुगम भाषा, वैज्ञानिक संकल्पनांची, संशोधनाची केलेली अतिशय लक्षवेधी मांडणी आणि गोष्टीवेल्हाळ रूपानं केलेलं वैज्ञानिक कथन यांच्या मिलापातून ‘सूक्ष्मजंतू ‘ हे देखणं पुस्तक साकार झालं आहे. या पुस्तकात सूक्ष्मजंतूच्या अन्वेषणाच्या जोडीला संशोधनासाठी वापरलेल्या छोट्याछोट्या बारकाव्यांचं केलेलं रसाळ वर्णन लेखकांच्या ज्ञानाच्या उत्तुंगतेबद्दल खूप काही सांगून जाते. ‘तो मी नव्हेच’, ‘आपले आरोग्य आपल्या पोटात!’ ही प्रकरणे वाचकांना खिळवून ठेवणारी, नवी माहिती देणारी आहेत.
डॉ. सौ. वर्षा परशरामी, माजी वरिष्ठ वैज्ञानिक, एनसीएल, पुणे
Reviews
There are no reviews yet.