Description
राजनीतीच्या अनुषंगाने विचार केला तर नेतृत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या कार्य कर्तृत्वाला अधिकाधिक वाव मिळतो आणि त्याचा लौकिक वाढण्यासाठी मदत होते. परंतु, अंगी गुण कौशल्यांची खाण असतानाही केवळ नेतृत्वाची संधी न लाभल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला उपेक्षा येते. शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्याबद्दलचा इतिहास हेच सांगतो.
संभाजीराजांना स्वतंत्रपणे नेतृत्व करण्याची संधी फारशी मिळालेली दिसत नाही. अपवाद फ़क्त शहाजीराजांना कैद झाल्याच्या घटनेचा. मुस्ताफाखानाने शहाजीराजांना कैद केल्यानंतर फर्रादखान हा सरदार संभाजीराजांच्या बेंगलोर नगरीवर चालून आला त्यावेळी प्रथमच संभाजीराजांना नेतृत्वाची धुरा स्वतंत्रपणे सांभाळण्यासाठी संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचे त्यांनी सोने करून दाखविले.
दूसरी गोष्ट अशी की, संभाजीराजे यांचे व्यक्तिमत्त्व रणांगणावरील पराक्रमाशिवाय आणखीनच ख़ास होते. विशेष म्हणजे संस्कृतसह विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदें आदींचा त्यांनी उत्तम अभ्यास केल्यामुळे त्यांचे बौद्धिक कौशल्य हे प्रभावी होते.
जयराम पिंड्ये नावाचा पंडित बेंगलोर येथील शहाजीराजांच्या दरबारात आश्रयास होता. तो म्हणतो, शहाजीराजांच्या पादरी सत्तरहुन अधिक विद्वान लोक आपल्या कला कौशल्यात्मक गुणांचे दर्शन घडवीत असत. त्याप्रसंगी संभाजीराजे हे स्वत: अनेक पंडितांना संस्कृतमध्ये स्वरचित समस्या घालीत असत. तसेच इतर पंडितांच्या समस्यांची पूर्तीही करीत असत. वेदाजी पंडित या प्रतिभावंताने सुद्धा संभाजीराजांच्या गुण कौशल्यांचे कौतुक मनापासून केले आहे. तो म्हणतो, संभाजीराजांना नृत्य, संगीत, काव्य आदी कलांमध्ये विशेष रुचि होती. तसेच कवी देवदत्तच्या म्हणण्याप्रमाणे, ” संभाजी हा शहाजीचा ज्येष्ठ सुपुत्र असून तो अत्यंत धोरणी, सद्गुणी, निष्ठावंत आणि देवदेवताप्रती आदराची भावना जोपासनारा असा राजपुत्र होता. त्यास राजधर्माची उत्तम जाण होती.
Reviews
There are no reviews yet.