Description
बांगला देशाला मुक्ती मिळवून देण्यासाठी झालेल्या युद्धाच्या नंतर पाव शतक उलटून गेल्यावर एक तरुण संशोधक, मुक्ती मरियमच्या आयुष्यात येते. तिच्याकडे असे कित्येक प्रश्न आहेत, ज्यांना कोणतेही उत्तरच नाही. ना मरियमकडे, ना अन्य कोणाकडे. मरियम आणि तिच्यासारख्या इतर स्त्रिया, वीरांगना ज्यांच्यावर पाकिस्तानी लष्करानं नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ सातत्यानं बलात्कार केले आहेत, त्यांना नव्या देशाचा अभिमान असं म्हटलं गेलं आहे. पण ज्यांचे कुटुंबीय आणि समाज त्यांच्याशी काही वेगळचं वागतो आहे. या युद्धात त्या कशा जिवंत राहिल्या? मरियमनं तिच्या धाकट्या भावाला पाठवून दिलं. पाना शहर प्रत्येक क्षणी जास्त जास्त धोकादायक बनत असतानाही स्वत:हा मात्र ढाक्यात का थांबली? घरांत, ऑफिसेसमध्ये, कॉलेजांत सापडलेल्या, पकडलेल्या स्त्रीयांशी पाकिस्तानी सैन्य कसं वागलं? मुक्तियोद्ध्यांनी ‘त्यांच्या’ स्त्रियांचं रक्षण केलं का?
मरियमच्या दृष्टीनं हे प्रश्न गैरलागू आहेत. त्यापेक्षा इतर भूतांची भीती तिला जास्त वाटते. मोंटुला वाचवण्यासाठी तिनं खूप प्रतत्न केले. पण युद्धाचा खरा अर्थ तिच्यापर्यंत पोचण्याचा आधीच युद्धानं त्याला गिळून टाकलं. हे असं कसं घडलं? तिच्या आयुष्यात आलेल्या, येऊन गेलेल्या पुरुषांच्या बाबतीत काय घडलं? जशिमुल हक, आबेद जहांदीर, इश्तियाक पहिला आणि दूसरा , हे सगळे कुठं गेले? स्वातंत्र्य म्हणजे तरी नेमकं काय? नव्या देशात ती आणि तिच्यासारखा इतर स्त्रियांसाठी काही जागा आहे का?
शाहीन अख्तर यांची मनाला चटका लावणारी आणि सुन्न करून टाकणारी कादंबरी. बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली. स्त्रियांवर केलेले अत्याचार आणि त्यांच्यावरच्या सगळ्या प्रकारच्या हिंसा कौशल्यानं समोर आणणारी. त्या स्त्रियांचं धैर्य आणि त्यांच्या हृदयभंगाचा कहाण्या सांगणारी. त्यांचा प्रेमासाठीचा शोध आणि त्यांची घोर फसवणूक या सगळ्याचा पट उलगडणारी. बांग्ला देशात लिहिल्या गेलेल्या या मूळ बंगाली कादंबरीला २००४ मध्ये बांगला देशात प्रोथम आलो पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
शाहीन अख्तर या बंगला देशातील कोमिला इथं जन्मल्या. ढाका विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्र विषय घेऊन एम. ए. शिक्षण पूर्ण केलं. कादंबरीकार आणि लघुकथाकार असलेल्या शाहीन अख्तर यांचे बँगला स्त्रियांच्या व्यथा मांडणारे काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत. ढाका आणि कोलकत्ता इथं ते प्रकाशित केले गेले आहेत. त्या तेथे मानव हक्क संघटनेसाठी काम करतात.
Reviews
There are no reviews yet.