Description
मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवणाऱ्या अशा या महाप्रतापशाली राष्ट्रीय वीराच्या अतुल पराक्रमांचे विस्तृत वर्णन स्वतंत्र चरित्रलेखनाच्या रूपाने करण्याच्या कामी महाराष्ट्रातील मोठमोठ्या विद्वान ग्रंथकारांकडून आजपर्यंत आळस किंवा अनास्था का झाली, हे कळत नाही. पूर्वकालीन बखरकारांनी व कवींनी शिवाजी महाराजांचा चरित्रमहिमा आपापल्या माहितीप्रमाणे व शक्तीप्रमाणे इतका गायला असता, आधुनिक विद्याचारसंपन्नतेच्या काळी स्वदेश, स्वराज्य इत्यादिकांविषयी सदोदित विचार प्रकट करणाऱ्या पंडितांकडून या महापुरुषाविषयी नुसता तोंडाने अभिमान प्रकट करण्यापलीकडे काहीच होऊ नये हे चमत्कारिक दिसते. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा अपहार करणाऱ्या किंवा स्वदेशाचा नाश करण्यास प्रवृत्त होणाऱ्या अनेक पुरुषांची चरित्रे मराठी भाषेत प्रसिद्ध व्हावीत आणि ज्या प्रौढप्रताप वीरमणीने स्वदेशास स्वातंत्र्य मिळवून देण्याचे सुयश संपादिले, त्याचे सविस्तर चरित्र लिहिण्याची स्फूर्ती कोणालाही होऊ नये यास काय म्हणावे ? नाही म्हणावयाला गुरुवर्य प्रो. राजारामशास्त्री भागवत यांनी शिवाजी महाराजांचे एक लहानसे चरित्र पुष्कळ वर्षांपूर्वी लिहून प्रसिद्ध केले होते; परंतु ते फार उटक होते. तसेच प्रकृत चरित्राची जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर एक बहुतेक तेवढ्याच आकाराचे चरित्र घाईघाईने छापून निघाले आहे; परंतु शिवरायांच्या प्रतापकिरणांचा समावेश अशा लहानशा अवकाशात होणे शक्य नाही हे बहुश्रुत वाचकांस सांगावयास नकोच.
Reviews
There are no reviews yet.