Description
त्याचे बोलणे आणि जगणे यात अंतर नव्हते. सारेच भेद मिटविण्याचा त्याने आयुष्यभर प्रयत्न केला. खासगी-सार्वजनिक, देश-जग, आध्यात्मिक-राजकीय असे त्याचे वेगवेगळे कप्पे नव्हते. संत सांगतात स्वतःला बदला. क्रांतिकारक सांगतात जग बदला. ‘जग बदलण्याची सुरुवात स्वतःपासून करा,’ असे सांगणारा तो एक (मेव) क्रांतिकारक संत होता.
तो खऱ्या अर्थाने ग्लोबल सिटिझन, अवघ्या विश्वाचा नागरिक होता. त्याला देशाच्या भिंती मान्य नव्हत्या. भारताचा राष्ट्रपिता असूनही तो ‘मी तेवढाच पाकिस्तानचाही आहे’, असे बिनदिक्कत म्हणत असे. तुम्हाला भेडसावणाऱ्या बहुतेक समस्यांवर त्याने काही तरी मूलभूत विचार केला आहे, याचा अर्थ त्याच्याकडे काही रेडीमेड उत्तरे आहेत असा नाही, कारण त्याच्या काळापासून आजचा काळ खूप भिन्न आहे; पण त्याच्या चिंतनातून तुम्हाला महत्त्वाची अंतर्दृष्टी (insight) मिळू शकेल. प्रश्न पर्यावरण संरक्षणाचा असो की शिक्षणव्यवस्थेचा, तंत्रज्ञानाचा असो की धर्मा-धर्मातील भांडणांचा, गांधीजींकडे तुम्हाला सांगण्यासारखे बरेच काही आहे.
आणखी एक. तुम्हाला खूपदा परंपरा की नवता, परंपरा की परिवर्तन, असा पेच पडतो. नवे जग तुम्हाला खुणावते, तसेच ते अनेकदा परके वाटते, भयभीतही करते. परंपरेतील अनेक वाईट गोष्टींचा राग येतो, पण त्याचबरोबर तिचे आकर्षण वाटते, तिच्यामुळे सुरक्षित वाटते. अशा वेळी परंपरा आणि परिवर्तन यांच्यातील दुवा म्हणून गांधी मदतीला येतो.
तो धर्म-संस्कृती- इतिहास यांच्यातील उत्तम तेवढे निवडतो, चुकीच्या गोष्टी टाकून देतो. स्वतः सनातनी असल्याचे जाहीर करतो. त्याच वेळी म्हणूनच ‘मला मिळालेल्या वारशाची चिकित्सा करण्याचा मला हक्क आहे,’ असेही बजावतो.
गांधीजींचे असे विविध पैलू उलगडून दाखवत त्यांचा परिचय करून दिला आहे गांधीविचारांचे अभ्यासक, प्रसारक असलेल्या एका कार्यकर्त्या लेखकाने. त्यातून पुढे येणारा वस्तुनिष्ठ इतिहास देशाविषयी प्रेम असणाऱ्या सर्वांनीच वाचायला हवा.
Reviews
There are no reviews yet.