Description
“घर-संसाराकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर उभा केलेला हा त्यांचा ‘लेखन – संसार’ कशासाठी होता ? सत्ता संपत्ती, मान-सन्मान या अमिषापोटी त्यांनी ही साधना केलेली नव्हती. पाणी नसलेला नारळ आणि गंध नसलेला फुलांचा हार गळ्यात पडावा आणि दुसऱ्या दिवशी रद्दीत जाणाऱ्या दैनिकामध्ये फोटोसह चमकावे या मोहापोटी त्यांनी हा ज्ञानयज्ञ पेटता ठेवलेला नव्हता. तर आपला अवघा समाज जाचक नि गतार्थ रुढी-परंपरेच्या आणि वर्णजातींच्या जोखडातून मुक्त व्हावा, समाजातील श्रेष्ठ-कनिष्ठ भावना नष्ट व्हावी, वैर आणि द्वेष यांची बाधा माणसाला व जातीला होऊ नये, कर्मकांडप्रधान उपासनेला शुद्धत्व लाभावे, समाजामध्ये सनातन मूल्यांची प्रतिष्ठा व्हावी, अवघा समाज इहवादी आणि विज्ञाननिष्ठ व्हावा, सर्वांनी उदारधर्माचा स्वीकार करावा. शूद्रातिशूद्रांच्या गळ्यात अडकलेल्या वेदनेचा हुंदका कमी व्हावा, प्रत्येकाने स्वातंत्र्य, समता, बंधुभाव याचा अंगीकार करावा, माणसाने माणसाला ‘माणूस’ म्हणून प्रेमाने जवळ घ्यावे. समाजात नांदणारी विषमता दूर व्हावी व अवघ्या मानव समाजाचे कल्याण व्हावे, यासाठी लेखनी वापरणारा हा थोर विचारवंत होता. थोर भाष्यकार होता. विवेक, व्यासंग, न्यायबुद्धी, समतोल, तटस्थता, संशोधन आणि शिस्त यांचे व्रतासारखे पालन करून आपल्या चिंतनाचे शाश्वत सार समाजाच्या ओंजळीत टाकणारा हा व्रतस्थ प्रबोधनकार होता.
समारोप करताना मी असे म्हणेन की, विज्ञान आणि अध्यात्म यांच्या पायावर सामाजिक प्रश्नांचे प्रबोधन करणारे, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग यांचा एकात्म साक्षात्कार घडविणारे, पैसा, प्रतिष्ठा, पद, पुरस्कार आणि प्रसिद्धी यांची जराही अपेक्षा न बाळगणारे; प्रांजळ आणि सत्यसाधकाची भूमिका ढळू न देणारे आणि दारिद्र्य, दुःख, उपेक्षा लेखनाच्या आड येत नाही याचा आदर्श समोर ठेवणारे; शांत, मितभाषी, नम्र, सौजन्यशील व निगर्वी रा. ना. चव्हाणांचे हे लेखन महाराष्ट्राचा आणि मराठी वैचारिक साहित्यातील अनमोल ठेवा आहे, यात शंका नाही.’
– मा. डॉ. द. ता. भोसले
‘विचार-दर्शन’
Reviews
There are no reviews yet.